Prakash Ambedkar: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतरही मंत्री गायब असणे हे अत्यंत गंभीर असून, “मंत्र्यालाच पोलिसांनी पळवले असेल तर सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचं काय?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कोर्टाला आणि न्यायही मानत नाही अशी असणारी ही परिस्थिती असल्याची खोचक टीका आंबेडकर यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लपवले
कोकाटे यांना मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लपवले जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप करत, दोन वर्षांची शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधीचा मताचा अधिकार संपुष्टात येतो, याची आठवण त्यांनी करून दिली. या पार्श्वभूमीवर कायद्याचा आणि न्यायालयाचा अपमान होणार नाही, याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, अशी स्पष्ट अपेक्षा आंबेडकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, नगरपालिका निवडणुकांबाबत बोलताना आंबेडकर यांनी भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांशी युती झाल्याचे सांगितले. महानगरपालिका निवडणुकांतही भाजपविरोधी आघाडी उभारली जाईल आणि त्यासाठी स्थानिक नेत्यांना निर्णयाचे पूर्ण अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात शिंदे गटाने चार दिवस थांबण्याचे केलेले आवाहनही चर्चेसाठी खुले असल्याचे त्यांनी सूचित केले.
ती भेट मुलीच्या इंग्लंडमधील शिक्षणाविषयीच्या चर्चेसाठी
हर्षवर्धन सकपाळ यांच्या भेटीबाबत कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे सांगत, ती भेट त्यांच्या मुलीच्या इंग्लंडमधील शिक्षणाविषयीच्या चर्चेसाठी होती, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच, शिवसेनेने मनसेसोबत जाऊन स्वतःची राजकीय पत घालवली असून, त्यामुळे कोकणातील कुणबी समाज, माथाडी कामगार आणि अमराठी वर्ग शिवसेनेपासून दूर गेला, असा दावा त्यांनी केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की, राजकारणात असताना अनेक गोष्टी माहिती असतात, मात्र ज्या बाबी देशाच्या हिताच्या नसतात त्या सार्वजनिकरित्या मांडू नयेत, हे भान ठेवणे आवश्यक असते. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे पाळणे गरजेचे होते, असा सूचक इशारा त्यांनी दिला.
वेळ न दवडता कारवाई करावी, रोहित पवारांची मागणी
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. सुनील केदार, राहुल गांधी यांच्यावर कुठलीही वेळ न दवडता कारवाई करण्यात आली होती, त्याचप्रमाणे सरकारने कोकाटेंवर देखील कुठलीही वेळ न दवडता कारवाई करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या