कोल्हापूरः येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने यंदापासून जनाबाई, सावित्रीमाई आणि कोयनामाई असे तीन पुरस्कार सुरू करण्यात आले असून त्यासाठी अनुक्रमे प्रज्ञा दया पवार, शुभदा देशमुख आणि प्राजक्ता हनमघर यांची निवड करण्यात आली आहे. तिन्ही पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी 25 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे असून पुरस्कार प्रदान समारंभ 24 मे रोजी सकाळी दहा वाजता शाहू स्मारक भवन येथे होणार आहे.
सातारा येथील कवयित्री प्रा. रामकली पावसकर यांच्यामार्फत हे पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्यावतीने आई कमल मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ कवयित्रीसाठी जनाबाई पुरस्कार आहे. त्यासाठी प्रज्ञा दया पवार (ठाणे) यांच्या हिल्लोळ हरवून आतबाहेरचा या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली. त्यासाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांनी काम पाहिले. सामाजिक क्षेत्रात काम करणा-या महिला कार्यकर्त्यासाठी देण्यात येणा-या सावित्रीमाई पुरस्कारासाठी शुभदा देशमुख (गडचिरोली) यांची निवड करण्यात आली. आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेमार्फत त्या गेली चाळीस वर्षे स्त्रियांच्या सबलीकरणासाठी काम करतात.
आदिवासी महिलांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर रचनात्मक कार्य उभारले आहे. स्त्री कलावंतासाठी देण्यात येणा-या कोयनामाई पुरस्कारासाठी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांची निवड करण्यात आली. कॉमेडीची बुलेटट्रेन या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या प्राजक्ता यांनी धिंगाणा, धुरळा, गोष्ट एका पैठणीची, बस्ता, पाणीपुरी, आता थांबायचं नाय अशा विविध चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. मराठी साहित्य तसेच विविध चळवळींशी जोडून घेणा-या प्राजक्ता हनमघर यांना आजच्या काळात ठाम भूमिका घेणा-या कलावंत म्हणून ओळखले जाते.
इतर महत्त्वाच्या बातम्या