Single Plastic Use Ban : कोल्हापूर जिल्ह्यात 1 जुलैपासून प्लास्टिक बंदीची (Single Plastic Use Ban) कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असलेल्या 'सिंगल यूज प्लास्टिक'ची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित उत्पादकांवर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादकांनाच निर्मिती केलेल्या उत्पादनाची विल्हेवाट किंवा पुनर्वापर करून  घ्यावा लागेल. याला सक्षम पर्याय निर्माण होत नाही, तोवर उत्पादकांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असणार आहे.


राज्यासह देशभरात 1 जुलैपासून 'सिंगल यूज प्लास्टिक'वर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमण्यात आला. त्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यानंतरही उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.


जिल्हा प्रशासनाकडून पाहणी करण्यात आल्यानंतर 'सिंगल यूज प्लास्टिक' विक्री होणारे गुजरातमध्ये निर्मित होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित उत्पादकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एका अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबत काय कारवाई केली याचा तपशील संबंधित नोडल अधिकाऱ्यांना दर १५ दिवसांनी भरावा लागेल.


तसेच ज्या ठिकाणी तपासणी केली, याबाबत तपासणी अधिकाऱ्यांना 'जिओ टॅगिंग' करावे लागेल. यामुळे तपासणी कुठे झाली हे स्पष्ट होईल. त्याचबरोबर उत्पादक तसेच विक्रेत्यांचा उत्पादनांवर शिक्का 'सिंगल यूज प्लास्टिक'वर संबंधित उत्पादक, विक्रेत्यांचा शिक्का आता असणार आहे. 


उद्योजक म्हणतात लगेच कारवाई नको


'सिंगल यूज प्लास्टिक' बंदी घालण्यात आल्यानंतर उद्योजकांनी लगेच कारवाई करू नका, असे आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्सच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने बैठक घेतली. यावेळी मंडळाचे अधिकारी प्रमोद माने  'सिंगल यूज प्लास्टिक' बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी उद्योजकांनी 'सिंगल यूज प्लास्टिक' आम्ही पाठिंबा देत आहोत, पण लगेच कारवाई करू नये, मुदत देण्यात यावी. अशी भूमिका मांडली. बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी प्रबोधन करण्यात यावे, असेही त्यांनी  सांगितले. कोणते प्लास्टिक चालते, कोणते चालत नाही याचीही माहिती द्यावी, असे उद्योजकांनी यावेळी सांगितले.