Ambabai Mandir Paid E-Pass : नवरात्रोत्सवामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दोनशे रूपये आकारून दिवसाला 1 हजार ई पास देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आता कोल्हापूर सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी ई पास निर्णयाला विरोध करत याचिका दाखल केली आहे. या याचिकेव आज सुनावणी होणार आहे. मुनीश्वर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. यानंतर न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस काढली असल्याचे मुनीश्वर म्हणाले. 


अंबाबाई मंदिरामध्ये महाराष्ट्र सरकारने देवीच्या दर्शनासाठी कोणत्याही देवस्थानने भाविकांसाठी नियमित रांगेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी घेण्यात येऊ नये व तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये. कोणत्याही मार्गाने रक्कम आकारून दर्शनासाठी प्रवेश देऊ नये. दर्शनासाठी पासेस किंवा प्रवेशपत्रिका वितरित करू नये, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना सात सप्टेंबर 2010 ला जाहीर केल्या होत्या. 15 ऑक्टोबर 2010 मध्ये मंजूर करून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने कोणालाही दर्शन देऊ नये म्हणून मनाई केली आहे. याबाबतचे पत्र देऊनही त्याचा विचार झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


दिवसाला फक्त 1 हजार भाविकांना पेड ई पासद्वारे दर्शन


नवरात्रोत्सव काळात अंबाबाई मंदिरात पेड ई पास सुविधा दिली जाणार आहे. या उपक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा विरोध केला होता. तथापि, जिल्हाधिकारी राहुल रेखावार पेड ई पास उपक्रमावर ठाम आहेत. उत्सव काळामध्ये ऑफलाईन पद्धतीने हे ई पास दिले जाणार आहेत. दिवसाला फक्त 1 हजार भाविकांना या पेड ई पासद्वारे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे इतर भाविकांची कोणतीही गैरसोय नसल्याचा दावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केला आहे. 


ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवली जाणार 


दररम्यान, देवीचा पालखी सोहळा, ललित पंचमी, नगर प्रदक्षिणा आणि दसरा सोहळ्यावर ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवली जाणार आहे. उत्सवाच्या काळात सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी 5 डोअर मेटल डिटेक्टर, 10 हँड मेटल डिटेक्टर आणि 15 वॉकी-टॉकी असतील. मंदिरात 58 सुरक्षा रक्षक आहेत आणि त्यांना पोलीस आणि होमगार्ड मदत करतील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकडवडे यांनी दिली आहे. 


26 सप्टेंबरपासून अंबाबाई मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्ज होत असून, महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागातून 25 लाखांवर भाविक कोल्हापुरातील मंदिराला भेट देतील अशी अपेक्षा आहे.