Kolhapur Shivsena : शिवसेनेला स्थापनेपासून राजकीय बंडाळी नवीन नसली, तरी ठाणेकर बंडवीर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीने शिवसेनेमध्ये (Shivsena) अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याच शिवसेना पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचताना भाजपशी हातमिळवणी करत एकनाथ शिंदे राज्याच्या  मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. 


बंडखोर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षावर दावा सांगितल्यानंतर आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची सुनावणी घटनापीठासमोर होणार असल्याने शिवसेनेत राजकीय संघर्ष सुरुच राहणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचे नेतेपद असूनही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसोबत केलेल्या बंडाळीनंतर आता पक्षाच्या खासदारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामध्ये जाहीरपणे पहिल्यांदा एकनाथ शिंदे गटाकडे सहानुभूती दाखवणाऱ्यांमध्ये खासदार भावना यांचा समावेश होता. खासदार श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव असल्याने त्यांची भूमिका स्पष्ट आहे. 


आता जाहीरपणे आणखी दोन शिवसेना खासदारांची मानसिकता एकनाथ शिंदेंच्या छत्रछायेखाली जाण्याची झाली आहे. हे दोन खासदार कोल्हापूर जिल्ह्यातील (kolhapur shivsena history) आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांचा त्यामध्ये समावेश आहे. या दोन्ही खासदारांनी मुंबईतील मातोश्रीवरील बैठकीला तसेच कोल्हापुरात झालेल्या पक्षाच्या मेळाव्याला गैरहजेरी लावल्याने राजकीय भूवया उंचावल्या होत्या. 


खासदार संजय मंडलिक यांच्याकडून शिंदे कळपात सामील होण्यावर जवळपास निश्चित झालं आहे. धैर्यशील माने सुद्धा लवकरच भूमिका जाहीर करतील, अशी शक्यता आहे. या दोन खासदारांनी बंड केल्यास हा जिल्ह्यातील शिवसेनेला ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यानंतर नक्कीच मोठा राजकीय हादरा असणार आहे. 


बाळासाहेबांचे स्वप्न होते कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेचे असावेत  


शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray kolhapur shivsena history) निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आई अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर ऐतिहासिक बिंदू चौकात सभा घेऊन फोडत असत. बाळासाहेब आणि कोल्हापूरचे नाते अगदी अतूट नाते असल्याने सातत्याने ते कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेचे असावेत असे सातत्याने बोलून दाखवत असत. मात्र, त्यांच्या हयातीत ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांनी संपूर्ण हयातीमध्ये कोल्हापूरमधून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत नवीन उमेदवार देऊन प्रयोग केला, पण कोणालाच विजय मिळवता आला नाही. मात्र, दुसऱ्या क्रमांकाची मते नेहमीच मिळाली. 


1991 पासून कोल्हापुरात राजकीय संघर्ष अन् 2019 ला शिवसेनेची विजयाची गवसणी


कोल्हापूर हा सुरुवातीपासून राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेसशी संघर्ष करताना शेतकरी कामगार पक्षाचीही ताकद,सुद्धा या जिल्ह्यात दिसून आली. मात्र, बेरजेच्या राजकारणात जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. शिवसेनेकडून पहिल्यांदाच 1991 मध्ये लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदा उमेदवार उतरवण्यात आला. तेव्हापासून ते 2014 पर्यंत शिवसेनेला विजयाने हुलकावणी दिली. 


शिवसेनेकडून सातत्याने आयात आणि वजनी उमेदवार देत तसेच ऐनवेळी उमेदवार बदल करूनही पाहिले. मात्र, विजयाची चव काही चाखता आली नाही. शिवसेनेला प्रत्येकवेळी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, पण विजय मिळू शकला नाही. शिवसेनेकडून पहिल्यांदा 1991 मध्ये रामभाऊ फाळके, 1996 मध्ये रमेश देव, 1999 मध्ये विक्रमसिंह घाटगे, 1999 मध्ये मेजर जनरल शिवाजीराव पाटील, 2004 मध्ये धनंजय महाडिक, 2009 मध्ये विजय देवणे, 2014 आणि 2019 मध्ये संजय मंडलिक यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. या सर्वांना प्रत्येक निवडणुकीत लाखांवर मते मिळाली, पण विजयाने हुलकावणी दिली. त्यामुळे बाळासाहेबांची मनोकामना त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली. 2014 पर्यंतच्या निवडणुकीत पाचवेळा शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 


2019 मध्ये कोल्हापुरातील बाळासाहेबांचे स्वप्न साकार 


2019 मध्ये संजय मंडलिक यांना शिवसेनेकडून कोल्हापूरमधून (kolhapur lok sabha constituency) दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. हातकणंगले मतदारसंघातून (hatkanangale lok sabha constituency) धैर्यशील माने यांना  संधी देण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोणताही आयात उमेदवार न देता योग्य खेळी केली होती. याच निवडणुकीतून आमचं ठरलंय हे वाक्य राज्याला मिळाले. कारण विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सतेज पाटील यांनी  आघाडीचा आदेश धुडकावत आपली सगळी यंत्रणा संजय मंडलिक यांच्या विजयासाठी उभा करत विक्रमी मतांनी विजयी केले होते. धनंजय महाडिक यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे जे स्वप्न बाळासाहेबांनी पाहिले होते ते पहिल्यांदाच 2019 मध्ये कोल्हापूरमध्ये पूर्ण झाले. शिवसेनेचा पहिल्यांदाच कोल्हापुरातून निवडून आला. 


हातकणंगले मतदारसंघातूनही धैर्यशील माने यांनी बाजी मारली


कोल्हापूरसह हातकणंगले मतदारसंघातही 2019 मध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. धैर्यशील माने (dhairyashil mane) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पराभव करत भगवा फडकावला. या मतदारसंघात धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनीही 1998 मध्ये निवडणूक लढवली होती, मात्र, त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. 


आता हेच दोन्ही खासदार एकनाथ शिंदेंच्या वळचणीला जाण्याची शक्यता 


एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर आता खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि धैर्यशील माने यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केलं असलं, तरी ते अवघ्या अडीच वर्षात धुळीला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा केवळ एक आमदार निवडून आला होता. तेच आमदार प्रकाश आबिटकर सुद्धा शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. आता शिवसेनेला पुन्हा एकदा नव्याने उभारी देण्याचे काम नेहमीच निष्ठेने लाखांवर एकगठ्ठा मतदान करणाऱ्या शिवसैनिकांवर आणि दुसऱ्या फळीतील शिवसेनेच्या नेत्यांवर असेल.


इतर महत्त्वाच्या बातम्या