Pahalgam Terror Attack : पहलगामच्या बैसरनमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याठिकाणी हल्ल्याच्या काही तास आधी कोल्हापुरातील तीन कुटुंब होती. सुदैवाने ही कुटुंब दहशतवादी हल्ल्यातून वाचले आहेत. पहलगामला गेलेले पर्यटक काल रात्री कोल्हापुरात दाखल झाले. ही घटना समजल्यानंतर आज सकाळपर्यंत पाहुण्यांचे फोन येत होते. घरातील सदस्य घाबरून गेले होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो असून आता सरकारने कठोर निर्णय घेऊन दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे अशी मागणी या पर्यटकांनी केली आहे.

वेळेत घोडे मिळाली नाहीत अन्..

वेळेत घोडे न मिळाल्याने कोल्हापुरातील अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पहलगामपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला होता. पहलगामपासून दीड किलोमीटर मागे असतानाच दहशतवाही हल्ला सुरु झाला होता. ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने हल्ल्याची माहिती देताच  अनिल कुरणे आणि त्यांचे सहकारी माघारी परतले. सध्या अनिल कुरणे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी जम्मू काश्मीरमध्ये सुखरूप आहेत.

काश्मीरमधील भ्याड हल्ल्याचा कोल्हापुरात मुस्लिम संघटनांकडून निषेध

दुसरीकडे, काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या. पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात मुस्लिम महिला हातात फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. ज्यांनी पर्यटकांवर हल्ला केला त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली. हिंदू मुस्लिम यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील करण्यात आला. 

महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी हेल्पलाईन

दरम्यान, पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि  त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24x7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे. 

काश्मीरमधील संपर्क क्रमांक 

श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालिन परिस्थिती संपर्क साधता यावा यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात (24x7) मदत कक्ष / आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. 

1) दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543

2) व्हॉट्सअॅप : 7006058623, 7780805144, 7780938397

इतर महत्वाच्या बातम्या