Kolhapur News: आजपासून राज्यभरातील शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शाळेच्या प्रांगणात लेकरांचा पहिला दिवस चिरंतन स्मरणीय करण्यासाठी पालकांसह अनेक शाळांमध्ये शिक्षकांकडूनही जोरदार आदरातिथ्य करण्यात आले. कोल्हापुरात अनेक शाळांमध्ये पारंपरिक पद्धतीने मुलांचे स्वागत करुन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. विशेष करुन शाळेमध्ये पहिल्यांदाच प्रवेश करत असलेल्या मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. तसेच काहींचा चेहरा पडलेलाही दिसून आला.


आपल्या पाल्यांना पहिल्या दिवशी शाळेमध्ये पोहोचवण्यासाठी पालकही पोहोचले. कोल्हापुरात मनपा शाळांची गुणवत्ता नेहमीच कौतुकास्पद राहिली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी या शाळा प्रसिद्ध आहेत. जरग नगरमधील लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग या मनपा शाळेची ख्याती अवघ्या कोल्हापूर शहरासह उपनगरांमध्येही आहे. याच मनपा शाळेत गुढीपाडव्याच्या  मुहूर्तावर शालेय प्रवेश कोणत्याही वशिल्याशिवाय प्रवेश निश्चित केला जातो. त्यामुळे पाडव्याच्या आदल्या दिवसापासून या शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी रांग लागते. प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. 


जरगनगर मनपा शाळेत मुलांचे विशेष स्वागत 


याच शाळेमध्ये आज पहिला दिवस असणाऱ्या मुलांचा स्मरणीय करण्यासाठी अत्यंत जोरदार आणि हटके पद्धतीने स्वागत करण्यात आले. इतकंच नाही, तर लेकरांचा शाळेतील प्रवेश हा चिरंतन स्मरणात राहावा यासाठी कुंकवाच्या पाण्यात ठसे घेऊन ते पालकांना देण्यात आले. त्यामुळे हा प्रसंग पालकांनी अत्यंत आनंदाने डोळ्यात अन् कॅमेऱ्यात कैद केला. यावेळी लेकरांचं होणारे कौतुक पाहून पालकही भारावून गेले. दुसरीकडे शाळेचा पहिला दिवस असल्याने शहरामध्ये प्रमुख चौकांमध्ये चांगलीच गर्दी दिसून आली. शालेय परिसर पालक आणि विद्यार्थ्यांच्या कलकलाटाने गजबजून गेला होता. 


शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा


दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज असून विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


केसरकर म्हणाले की, विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पाने देण्यात आली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्स देण्यात येणार आहेत. शेतीचे ज्ञान आवश्यक असल्याने यापुढे शेती विषय शिकविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोणतेही काम करण्यात कमीपणा नसतो हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी श्रमाची महती समजून घ्यावी आणि माणुसकी जपावी असा सल्लाही केसरकर यांनी दिला. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा आणि महाराष्ट्रासह देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा. 


इतर महत्वाच्या बातम्या :