Kolhapur Road: गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहराची ओळख कचरापूर आणि खड्डेपूर अशीच झाली आहे. शहरातील मोजके रस्ते सोडल्यास महापालिकेनं उखडून दैना केली आहे किंवा केल्यानंतर दोन दिवसांत त्याला जेसीबी लावून गळतीच्या नावाखाली पुन्हा उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे अत्यंत गाजावाजा झालेल्या कोल्हापूर शहरातील 100 कोटींच्या रस्त्यांनी शहरवासियांना थोडा आराम मिळेल, अशी आशा होती. मात्र, ती आशा सुद्धा टीचभर पावसातच फोल ठरली असून या प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचा महापूर तयार झाला आहे. रस्त्यांच्या गुणवत्तेवरून नेहमी तांत्रिक भाषेची मखलाशी अधिकाऱ्यांकडून केली जाते. मात्र, आयआरबीनं 15 वर्षांपूर्वी कोल्हापुरात 220 कोटी अंतर्गत केलेल्या रस्त्यांचा दर्जा आजही कायम आहे. मात्र, मनपाकडून करण्यात आलेल्या रस्त्यांचा दर्जा आणि आता 100 कोटी अंतर्गत होत असलेल्या रस्त्यांचा दर्जा का नाही? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. 100 कोटींचा प्रकल्प सुरवातीपासून टक्केवारीमुळे चर्चेत आहे. त्यामुळे आता दर्जा पाहून किती टक्केवारी झाली असेल, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
दसरा चौक ते रेसकोर्स नाका रस्ता काही दिवसांमध्येच उखडला
दसरा चौक ते रेसकोर्स नाका हा 100 कोटी रस्ते प्रकल्पातील मुख्य आणि वर्दळीचा मार्ग आहे. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविकही याच मार्गावरून येत असतात. या मार्गावर अवघ्या काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेला सीलकोट उखडून बेसकोट उघडा पडला आहे. याच मार्गाव बेसकोटही पाण्याच्या खजिन्याजवळ उखडला गेला होता. तेव्हा सीलकोट करण्यात येणार असून त्यावेळी दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती मनपा प्रशासनकडून देण्यात आली होती. आता सीलकोट करूनही एकाच पावसात उखडला गेला आहे. त्यामुळे या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दसरा चौक, खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, शिंगोशी मार्केट आदी ठिकाणी नव्याने केलेला रस्ता उखडला गेला आहे.
रेसकोर्ससमोर नवा रस्ता खोदला
नव्या रस्त्यांवर खड्ड्यांनी महापूर केला असताना रेसकोर्स नाक्यासमोर दोन ठिकाणी गळती काढण्यासाठी दोन खड्डे खोदण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा एकदा जवळपास 100 मीटर रस्ता पुन्हा खड्ड्यात गेला आहे. रस्ता केल्यानंतर दोन दिवसात खड्डा पाडून रिकामा व्हायचं हा आजवरचा कोल्हापूर मनपाचा इतिहास झाला आहे.
दुरुस्ती करून घेऊ; मनपा, कंत्राटदाराकडून सारवासारव
रस्त्यांच्या गुणवत्तेवरून महापालिकेकडून जबादारी देण्यात आलेल्या अधिकारी सुरेश पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना या खड्ड्यांसंदर्भात कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी रस्ता उखडण्यात आला आहे ते काम आम्ही कंत्राटदाराकडून करून घेणार असल्याचे सांगितले. सुरेश पाटील यांनी पाऊस लवकर सुरु झाला होता, याकडे लक्ष वेधले. दुसरीकडे, सत्तार मुल्ला यांनी महापालिकेकडून नोटीस मिळाल्याचे सांगितले. त्यांनी फक्त दसरा चौकात सीलकोट उखडला असून आम्ही तो पुन्हा करून घेणार असल्याचे सांगितले. सत्तार मुल्ला यांनीही खड्ड्याचे खापर पावसावर फोडले. मात्र, रस्त्याच्या गुणवत्तेचं काय? पहिल्या पावसात अशी दयनीय स्थिती होत असेल, तर गुणवत्तेच काय? याबाबत मनपा आणि कंत्राटदार समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. दरम्यान, कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, होऊ शकला नाही.
कचरा आणि खड्डे हीच शहराची ओळख
कोल्हापूर शहरात प्रवेश करतानाच कचरा आणि खड्ड्यातून होत आहे. जिथं मोकळी जागा असेल तिथं कचरा कोंडाळे तयार होत आहेत. त्यामुळे शहरवासियांचा बेशिस्तपणा सुद्धा शहराच्या आरोग्याला मारक ठरत आहे. कधीकाळी महापालिकेडून कचरा उठावासाठी लोखंडी कंटेनर ठेवण्यात आले होते. मात्र, ते कंटेनरही अलीकडे गायब झाल्याचे दिसून येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या