Rohit Pawar on Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) सातत्याने पवार कुटुंबीयांवर टीका करत आहेत. या टीकेला आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोल्हापुरातून चोख प्रत्युत्तर दिले. पवारांच्या राजकारणाची काळजी करण्यापेक्षा पडळकरांनी स्वतःच्या राजकारणाची काळजी करावी, पवार त्यांना कळणार नाहीत, अशा शब्दात रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकरांना टोला लगावला.
'महाराष्ट्र व्हिजन फोरम'साठी रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कार्यक्रमाची माहिती दिली. रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्याकडून पवार कुटुंबावर केल्या जाणाऱ्या टीकेचाही समाचार घेतला. पवार म्हणाले, "पवार कुटुंबावर बोलण्यासाठी काही जणांना आमदार करण्यात आलं आहे. गोपीचंद पडळकर हे त्यांच्या राजकारणासाठी पवारांवर बोलतात. मात्र, त्यांनी पवारांची काळजी करू नये. पवारांच्या राजकारणाची काळजी करण्यापेक्षा पडळकरांनी स्वतःच्या राजकारणाची काळजी करावी, पवार त्यांना कळणार नाहीत."
बावनकुळेंनी पंतप्रधानांचा सल्ला घ्यावा
रोहित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही फटकारले. ते म्हणाले, "भाजपला महाराष्ट्राची क्षमता व विचारसरणी कळलेली नाही. बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करण्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला घ्यावा. मोदी बावनकुळे यांना भेटण्यासाठी वेळ देतील का? हा नंतरचा विषय आहे." दरम्यान, पहाटेच्या शपथविधीवरुन रोहित पवार यांनी दोनच व्यक्ती खरं काय ते सांगू शकतील, असे सांगितले. त्यापैकी एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे म्हणजे अजित पवार. तेव्हा नेमके काय घडले तेच यासंबंधी अधिक स्पष्टपणे सांगू शकतील."
भाजपला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष मदत होईल असे कोणतेही वक्तव्य आणि कृत्य कोणी करू नये. भाजपच्या विरोधात खंबीरपणे लढत असेल,तर सगळ्यांनी मोठे मन दाखवायला हवं. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होते, त्या ठिकाणी भाजप उमेदवाराला फायदा झाल्याचे रोहित पवार म्हणाले.
आजच्या आज राष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा द्या
रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही टोला लगावला. पेन, पेपर घ्या आणि आजच्या आज राष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा द्या, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी फटकारले. नवीन येणारे राज्यपाल नक्कीच यांच्यापेक्षा चांगले असतील अशी आशा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या