Sharad Pawar on Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रात आल्यापासूनच महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्ये करण्याची मालिकाच लावलेल्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे राज्यामध्ये राज्यपाल बदलाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया देताना खोचक टीका केली. ते आज कोल्हापूरमध्ये बोलत होते. कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रावरून मोजक्या शब्दात टीका करताना राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होत आहे ही चांगली गोष्ट असल्याचे सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये राज्यपाल कोण होणार याची चर्चा रंगली आहे. यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत अजून कोणतेही भाष्य करण्यात आलेलं नाही. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, राज्यामध्ये कोण राज्यपाल येणार हे माहित नाही. मात्र, आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ही चांगली गोष्ट आहे.


माहितीपटावर बंदी घालणे हा लोकशाहीवर हल्ला


गेल्या काही दिवसांपासून वादाचा केंद्रबिंदू बनलेल्या मोदींच्या माहितीपटावरून शरद पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, माहितीपटावर बंदी घालणे हा लोकशाहीवर हल्ला आहे. ते म्हणाले की, धार्मिक मुद्यांवर लोक मतदान करणार नाहीत. पवार यांनी राहुल गांधी यांच्या सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेवरू भाष्य केले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सामान्य नागरिकांकडून पाठिंबा दिला जात आहे. राहुल गांधी यांची प्रतिमा वेगळी भासवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यात्रेच्या माध्यमातून आता उत्तर मिळालं आहे. 


विरोधकांची एकी करण्याचा प्रयत्न


एका सर्व्हेवरून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला लोकसभेलाल 34 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकार राहील की नाही अशी चिन्हे आहेत. त्यामुळे विरोधकांची एकी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, अजूनही कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या असून त्या पहिल्यांदा सोडवाव्या लागतील. विरोधकांच्या समन्वयाबाबत दिल्लीमध्ये चर्चा सुरू होईल. बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांचा अजूनही सत्ताधाऱ्यांविरोधातील विरोध कमी झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.


प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना पंतप्रधान मोदींकडून केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत नसल्याचे म्हटले होते. त्यांनी हा मुद्दा खोडून काढताना नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणा लावला जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सामान्य नागरिकांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या