Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पूर्व प्राथमिक ते विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. निबंध 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) शाहूपुरी, 3 री गल्ली, बी. टी. कॉलेज परिसर, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत. या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी कळविले आहे.
निबंध स्पर्धेचे स्तर व विषय खालीलप्रमाणे आहेत
- पूर्व प्राथमिक शिक्षण (अंगणवाडी सेविका) - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्रतिबिंबित झालेले पूर्व प्राथमिक शिक्षण.
- प्राथमिक शिक्षण (1 ली ते 8 वी शिक्षक) - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्रतिबिंबित झालेले प्राथमिक शिक्षण.
- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (9 वी ते 12 वी शिक्षक) - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्रतिबिंबित झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण.
- उच्च शिक्षण (पदवी आणि पदव्युत्तर पदवीला अध्यापन करणारे प्राध्यापक) - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्रतिबिंबित झालेले उच्च शिक्षण.
- शिक्षक शिक्षण (डी.एड व बी.एड अध्यापकाचार्य व प्राध्यापक) - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्रतिबिंबित झालेले शिक्षक शिक्षण याप्रमाणे विषय आहेत.
ही निबंध स्पर्धा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमातील अंगणवाडी सेविका, शिक्षक, अध्यापकाचार्य व प्राध्यापक यांच्यासाठी आयोजित केली आहे. निबंध लेखनाचे माध्यम मराठी भाषा असेल. निबंध लेखनाची शब्द मर्यादा 2500 ते 3000 एवढी असावी. निबंध लेखनाचे संदर्भ लिहिणे अनिवार्य आहे. तसेच निबंध हा गुगल इनपुटमध्ये टाईप करून फॉन्ट साईज शीर्षकांसाठी 14 व मजकुरासाठी 12 इतका असावा. निबंध लेखनामध्ये कोणत्याही प्रकारच्या आकृत्या, चित्रे समाविष्ट करु नयेत. निबंध स्पर्धेमध्ये प्रत्येक स्तरातील प्रथम तीन क्रमांकाचा संस्थेमार्फत सन्मान करण्यात येणार आहे.
या निबंधासोबत निबंध हा मी स्वत: लिहिलेला आहे, यासाठी संदर्भ साहित्याचा फक्त आधार घेण्यात आलेला आहे. संदर्भ साहित्यातून कोणताही मजकूर जशाच तसा घेण्यात आलेला नाही. याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. निबंधासोबत मुख्याध्यापक किंवा कार्यालय प्रमुखाचे प्रतिज्ञापत्र सादर करावे. जिल्ह्यातील निबंध स्पर्धेसाठी रोटरी क्लब तसेच शिक्षक पतपेढ्यांचे सहकार्य लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त शिक्षकांनी व इतर घटकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही शेख यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या