Kolhapur News: कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी व्हाॅट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस लागल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर मुस्लीम संघटनांनी सुद्धा पत्रक प्रसिद्धीस देत पोलिसांनी समाजकटंकांना वेळीच ठेचावे, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे केली आहे. कोल्हापुरात मंगळवारी घडलेल्या प्रकारानंतर आज (7 जून) बंदची हाक देण्यात आली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत अशा घटना पुन्हा होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. मुस्लीम समाजाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही तरुणांनी लावलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूरच्या एकतेला तडा गेल्यासारखे वातावरण झालं आहे. पोलिसांनी अशा समाजकंटकांना वेळीच ठेचावे, त्यांना कडक शासन करावे, तरच अशा प्रवृत्ती पुन्हा निर्माण होणार नाहीत, असे पत्रकात म्हटले आहे.  


प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोल्हापुरातील मुस्लीम समाज छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांना आदर्श मानून त्यांच्या विचारांनी जगत आहे. राजर्षी शाहूंची नगरी सलोख्याची नगरी म्हणून प्रसिद्ध असताना काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह स्टेटस लावले, त्या समाजकंटकांना कुणीही पाठिशी घालणार नाही. अन्यायी व जुलमी राजवटीविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. बारा बलुतेदार व अठरापगड जातींना न्याय देणारे हे स्वराज्य होते. अशा छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक दिनी ही घटना घडणे दुर्दैवी आहे. अशा समाजकंटकांमुळे कोल्हापूरची शांतता, एकोपा, बंधुभाव बिघडू देऊ नये, याची आपण सर्वांनी दक्षता घेऊन शांतता प्रस्थापित करूया, असे आवाहन समस्त कोल्हापूरवासीयांना करीत आहोत. 


संबंधित तरुणाने केलेल्या कृत्याचाही जाहीर निषेध करत असून, पोलिसांनी त्याच्यावरही कडक कारवाई करावी. या पत्रकावर कादर मलबारी, आदिल फरास, रियाज सुभेदार, अफजल पिरजादे, जाफरबाबा सय्यद, झाकीर कुरणे, तौफीक मुल्लाणी, अब्दुल हमीद मिरशिकारी, मुश्‍ताक मलबारी, वासीम चाबुकस्वार यांच्या सह्या आहेत.


कोल्हापुरात बंदी आदेश


दरम्यान, कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या