Murlidhar Jadhav : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकुळ - Gokul) स्वीकृत संचालक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Murlidhar Jadhav) यांची नियुक्ती कायम राहणार आहे. मुरलीधर जाधव यांनी निवड तडकाफडकी रद्द करण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली होती. न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कानउघडणी करत मुरलीधर जाधव यांचे संचालकपद कायम ठेवले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असताना जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. 


न्यायमूर्ती के. एच. श्रीराम व राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. बुधवारी झालेल्या सुनावणीत सरकारने आम्हाला नेमणुकीचा अधिकार आहे तसा ती रद्द करण्याचा अधिकार असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले होते. न्यायालयाने या भूमिकेला आक्षेप घेतला होता. जाधव यांची नियुक्ती निबंधकांनी केली व नियुक्ती रद्दचा आदेश उपसचिवांनी काढला. उपसचिव हे निबंधक आहेत का? अशी विचारणा न्यायालयाने केली होती. ज्या कायद्यानुसार त्यांची नियुक्ती केली त्या कायद्यामध्ये त्यांना काढून टाकण्याची काय तरतूद आहे? अशीही विचारणा न्यायालयाने केली होती. सरकारने केलेली नियुक्ती सरकार बदलले म्हणून बदलता येणार नाही अशीही टिप्पणी न्यायालयाने केली होती. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानतंर फुटीर गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष दिवसागणिक तीव्र होत चालला असतानाच त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दोन्ही गटांची न्यायालयीन लढा सुरु असतानाच त्याचा फटका ज्यांच्या जीवावर नेते मोठे झाले त्या निष्ठावंत शिवसैनिकांना सुद्धा बसला आहे. याची प्रचिती कोल्हापूरमध्ये आली होती.


नियुक्ती झाल्यानंतरही मुरलीधर जाधव यांचा संघर्ष 


गोकुळमध्ये शासन नियुक्त प्रतिनिधी झाल्यानंतर मुरलीधर जाधव यांना सहज प्रवेश गोकुळमध्ये झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी आंदोलन करून हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली होती. शासन नियुक्त प्रतिनिधीला संचालक मंडळाने ठराव संमत करून सरकारकडे द्यावा लागतो. मात्र, त्यामध्ये गोकुळकडून तीन महिने दिरंगाई झाल्याने मुरलीधर जाधव यांनी आंदोलन केले होते. 


त्यानंतर अलीकडेच शासन नियुक्त मुरलीधर जाधव यांच्यासह दोन स्वीकृत संचालक म्हणून युवराज पाटील व विजयसिंह मोरे यांची नियुक्ती झाली होती. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुरलीधर जाधव यांच्या पाठिशी ठाम राहिल्याने गोकुळमधील सत्ताधाऱ्यांना नमते घ्यावे लागले होते. त्यामुळेच मुरलीधर जाधव यांचा गोकुळमधील प्रवेश सुकर झाला होता. मात्र, सत्तांतर झाल्याने आता परिस्थिती बदलली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या