Dhananjay Mahadik : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी काल शाहू महाराज छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली. राज्यसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. राज्यसभा निवडणुकीवेळी कोल्हापूर राज्यात केंद्रबिंदू झाले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. सोबत त्यांनी राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी माघार घेतली होती.


शिवसेनेकडून संभाजीराजे पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती. तथापि, त्यांनी मागणी ठोकरल्याने शिवसेनेकडून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. मात्र,महाविकास आघाडी सरकारची मते फुटल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 



दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची मते फोडत अनपेक्षितपणे खासदार धनंजय महाडिक यांचा विजय खेचून आणला होता. यानंतर महाविकास आघाडी आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्याचे  चित्र समोर आले होते.  शिवसेनेकडून पाठिंबा नाकारण्यात आल्याने संभाजीराजे यांनी चांगलीच आगपाखड केली होती. मात्र, शाहू महाराज यांनी संभाजीराजे यांना खडे बोल सुनावले होते. या दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शाहू महाराज यांची घरी जाऊन भेट घेतली होती.


इतर महत्वाच्या बातम्या