Dhananjay Mahadik on Satej Patil : संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी केलेल्या मागणीनंतर गोकुळमध्ये (Gokul) चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या चौकशीवरून सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये चांगलेच रणकंदन माजले आहे. दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. सतेज पाटील आणि शौमिका महाडिक यांच्यात कलगीतुरा रंगला असतानाच आता यामध्ये खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनीही पहिल्यांदाच सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. गोकुळवर प्रशासक आणण्यासाठी सतेज पाटलांनी जंग जंग फळ पछाडले होते. आता त्यांची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांचे आणि गोकुळचं नुकसान होताना दिसत आहे. 


'दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे'


धनंजय महाडिक यांनी गेल्या एक ते दीड वर्षांमध्ये गोकुळमध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप केला. तुम्ही सगळं करून बसला. मात्र, तुम्हाला यश आलं नाही. त्यामुळे आता दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. चाचणी लेखापरीक्षणानंतर गोकुळ भ्रष्टाचार येईल, असा इशारा त्यांनी दिला. सतेज पाटील यांनी चौकशीच्या आदेशानंतर चांगलीच टीका केली होती. त्यांनी म्हटले होते, की आम्ही ठरवलं असतं, तर गोकुळ आणि राजाराम कारखान्यावर प्रशासक आणू शकलो असतो. मात्र, आम्ही द्वेषाचे राजकारण करत नाही. दुसरीकडे गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण मंगळवारपासून सुरु होणार आहे. यासाठी गोकुळला आदेशही प्राप्त झाला आहे. त्यामुळे हा वाद अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत. 


'प्रकल्पाला मंजुरी दिल्याशिवाय त्याची वाच्यता करत नाही'


धनंजय महाडिक गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या बास्केट ब्रिजची पायाभरणी 28 जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, फ्लायओव्हरच्या माध्यमातून हा रस्ता व्हावा यासाठी मी प्रयत्न केले. त्यासाठी निधीदेखील मंजूर झाला. मात्र, माझ्या पराभवानंतर दुर्दैवाने हा प्रकल्प थांबला होता.  आता राज्यसभा खासदार झाल्यानंतर पुन्हा या प्रकल्पाची सुरुवात होत आहे. मी कोणत्याही प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याशिवाय त्याची वाच्यता करत नाही. असल्या कोणत्याही ब्रिजची संकल्पनाच नाही, असा विरोधकांनी प्रचार केला होता. या ब्रिजनंतर कोल्हापूरच्या वैभवात भर पडणार आहे.


'आमदार आमच्या संपर्कात '


दुसरीकडे, धनंजय महाडिक यांनी आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतर पक्षातील आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यानंतर आता महाडिक यांनी सुद्धा आमदार संपर्कात असल्याचे म्हटले आहे. ठाकरे सरकारच्या कार्यकाळामध्ये अनेक जण नाराज होते. त्यांच्या नाराजीला कंटाळून आमच्या अनेकजण संपर्कात असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या