Startup : तरुणांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग करुन उद्योगनिर्मिती करताना अपयश आल्यास खचून न जाता जिद्दीने वाटचाल करुन यशाच्या दिशेने पुढे जावे, प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अशा 'स्टार्ट अप' शिबिरातून जिल्ह्यात अधिकाधिक नवउद्योजक घडावेत, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि शिवाजी शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र स्टार्ट अप यात्राच्या दुसऱ्या टप्प्यामधील जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्याहस्ते झाले, या यावेळी ते बोलत होते. 


कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करुन स्टार्टअप सुरु करण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. समाजात आढळणाऱ्या बाबींकडे टीकात्मक नजरेतून न बघता त्यातून चांगला बदल घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी सर्वप्रथम आपली मानसिकता बदलून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे.  विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी प्रयत्न करावा, यासाठी विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.


प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, नवकल्पनांवर आधारित स्टार्टअप मध्ये तरुणांचा सहभाग आवश्यक आहे. रस्त्यावरील पालापाचोळा, खराब प्लास्टिक अशा टाकाऊ वस्तूंचा वापर करुन पर्यावरणपूरक नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी पुढे येत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. अशा प्रकारची स्टार्ट अप शिबीरे, यात्रांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या मनातील नव संकल्पनांना मूर्त स्वरुप येइपर्यंत जिद्दीने वाटचाल करायला हवी.


नवउद्योजक कृष्णराज धनंजय महाडिक यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी ते कार रेसर ते उद्योजक होईपर्यंतचा जीवन प्रवास उलगडून दाखविला. विद्यार्थ्यांनी, तरुणांनी ध्येय, चिकाटी ठेवून नवउद्योगनिर्मिती करावी. तसेच खडतर परिश्रमाने आणि जिद्दीने उद्योगधंद्यात यशस्वी व्हावे, असे सांगितले. अनेक व्यक्ती वयाच्या 45 ते 50 व्या वर्षीदेखील उद्योगनिर्मिती करुन यशस्वी उद्योजक बनल्या आहेत. त्यामुळे उद्योग निर्मितीसाठी वय अथवा अन्य कोणत्याही गोष्टीचे बंधन नसून जिद्द, खडतर मेहनत महत्वाची असल्याचे दाखले त्यांनी दिले. केंद्र सरकार आणि राज्य शासन सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगधंद्यासाठी मोलाचे सहकार्य करत असून त्याचा लाभ तरुणांनी घ्यायला हवा, असे सांगून नवउद्योजक बनताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करु, असे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकातून सहायक संचालक संजय माळी यांनी स्टार्टअप यात्रा सुरु करण्यामागील उद्देश विशद केला. तसेच उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या नवसंकल्पनांना जिल्हा व राज्यपातळीवर आकर्षक बक्षिस देण्यात येणार असल्याचे सांगितले. आभार डॉ. प्रकाश राऊत यांनी मानले.


इतर महत्वाच्या बातम्या