Kolhapur : कोल्हापूर शहरात प्रवेश करताना शाहू नाका ते सायबर चौकापर्यंत तसेच हाॅकी स्टेडियम चौक ते सायबर चौकापर्यंत तसेच आर. के. नगर चौक ते शांतीनिकेतनपर्यंत हा अपवाद सोडल्यास शहरातील रस्त्यांची अवस्था गावाच्या पाणंदीपेक्षाही भयंकर झाली आहे. शहरातंर्गत एकही रस्ता शोधून सापडत नाही ज्या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य नाही. सायबर चौकाकडून राजारामपूरीकडे येताना, तर जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. गेल्या पाच वर्षांपासून त्या रस्त्याला डांबर मिळालेलं नाही.
शहरातील खड्ड्यांमुळे दररोज अनेक अपघातही घडत आहेत. शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे व्यथा मांडूनही रस्त्यांमध्ये सुधारणा झालेली नाही. दुर्दैवाचा फेरा म्हणजे पाऊस पडल्यानंतर कोल्हापूर अनेक सखल भाग तुंबून जातात. त्यामुळे तुंबलेल्या पाण्यातून आणि महाकाय खड्डे यातून वाट काढत घर गाठावे लागते. गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर शहराला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे वाहतूकदारांची पार दैना झाली. चांगले रस्ते कोल्हापूरकरांच्या नशिबीच नाहीत का? असाच काहीसा प्रश्न पडत आहे.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांबरोबर गल्लीबोळ सुद्धा खड्ड्यांनी भरून गेले आहेत. शहरातील अंतर्गत रस्ते घुशीने शेत पोखरावे, त्या पद्धतीने खड़्ड्यांनी पोखरले गेले आहेत. त्यामध्येही ऐन पावसाळ्यात मुरुम टाकून खड्डे बुजवल्याने पाऊस लागल्यानंतर चिखल आणि पाऊस गेल्यानंतर नुसता धुरळा असा प्रकार झाला आहे. त्यामुळे गाडी मारताना डोळ्यांनाही इजा होऊ लागल्या आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांचा आकारच इतका मोठा आहे, की त्यात मुरुम टाकल्यानंतर पाऊस पडला की, चिखलाचे साम्राज्य तयार होते. भरीत भर म्हणजे रस्ता केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खोदायचा हा पराक्रम, फक्त कोल्हापूर मनपाच करू शकते.
रस्त्यांवरून गाडी मारायची की कुरकुड्या घालायच्या?
हाॅकी स्टेडियम ते रामानंदनगर पुलापर्यंत तसेच संभाजीनगर ते नंगीवली चौक, बेलबाग ते गोखले काॅलेज चौकापर्यंत या रस्त्यांवरून गाडी मारत आहोत की कुरकुड्या घालत जात आहोत हेच समजत नाही. गेल्या काही दिवसांपासून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले असले, तरी करून आठवडा होत नाही तोवर ते उखडून जात आहेत. त्यामुळे आंधळं दळतंय आणि कुत्र पीठं खातंय अशी परिस्थिती झाली आहे. हा पाढा इतक्यावर थांबत नाही. शहरातील अनेक ठिकाणी जे स्पीड ब्रेकर आहेत त्यावरही पट्टे मारले नसल्याने ते दिसूनच येत नाहीत.
वाहतूक कोंडी नित्याचीच
मुळातच कोल्हापूर शहरातील रस्ते अतिशय चिंचोळे आहेत. त्यात त्यांची खड्ड्यांनी पार चाळण करून टाकली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. भाऊसिंगजी रोडवरील भाऊगर्दी, तर दररोज अपघाताला निमंत्रण देणारी आहे. त्यामुळे या मार्गावरील महापालिकेनजीक उड्डाणपूल तसेच शासकीय कार्यालयांचे विकेंद्रीकरण ही काळाची गरज आहे. करवीर पोलिस स्टेशनला सोयीस्कर अशी पर्यायी जागा दिल्यास निश्चित या रस्त्यावरील ताण कमी होऊ शकतो.
रंकाळा चौक, गोखले काॅलेज चौक, संभाजीनगर पेट्रोल पंप, बाईचा पुतळा, सायबर चौक, धैर्यशील प्रसाद हाॅल चौक या ठिकाणांवर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. पत्रकारांकडून वाहतूक कोंडी निर्दशनास आणून दिल्यानंतरही दुसराच कुठला, तर फोटो व्हायरल करून वाहतूक सुरळीत सुरु असल्याचा थाट प्रशासनाकडून आणला जातो हे संतापात भर टाकणारे आहे. दुसरीकडे सिग्नल पाळणे, वाहतूक नियमांचे पालन करणे, कोल्हापूरकरांच्या नियमात नसल्याने वाहतूक कोंडीला अधिक हातभार लागत आहे.
शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवरही खड्डेच खड्डे; खड्डा नेमका कोणता चुकवायचा?
कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-सातारा आदी मार्गांना सुद्धा खड्ड्यांनी पोखरले आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करताना येणाऱ्यांची सुरुवात शिव्यांची लाखोली वाहूनच होते. सांगलीकडे जाताना शिरोली फाट्यापासून ते रुकडीपर्यंत या मार्गावर इतके खड्डे पडले आहेत की त्यामुळे नेमका कोणता खड्डा चुकवायचा आणि एक चुकवला, तरी दुसऱ्या खड्ड्यात गेल्याशिवाय पर्याय नाही, अशी भयंकर अवस्था झाली आहे. रस्त्यावरून प्रवास करताना घरी संध्याकाळी सुरक्षित जाता येईल की नाही? असाच प्रश्न उभा राहतो.
इतर महत्वाच्या बातम्या