कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसध्येच (Kolhapur Congress) नव्हे, तर राज्याच्या राजकारणात गेल्या पाच दशकांपासून संयमी, शांत, सुसंस्कृत स्वभावाने आणि पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून आपल्या प्रतिभेची छाप सोडलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील (वय 71) यांचे आज (23 मे) कोल्हापुरात एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा राजेश, राहूल, विवाहित मुलगी टीना, बहिण दमयंती मोहिते यांच्यासह मोठा परिवार आहे. पी. एन. पाटील यांच्या पत्नी जयादेवी यांचे 2012 मध्ये निधन झाले होते.
पांडूरंग निवृत्ती पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असले, तरी त्यांची पी. एन. पाटील यांची आयुष्यभर ओळख राहिली. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) एक महिना आमदार पी.एन. पाटील यांनी झंझावाती प्रचार केला होता. आमदार पी. एन. पाटील नेतृत्व करत असलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघामधून सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे 4 जून रोजीचा निकाल पाहण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याने मनाला चुटकी लावणारी एक्झिट झाली आहे.
गेल्या साडे चार दशकांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय
पी. एन. पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. जिल्हा काँग्रेसचा कणा म्हणूनच त्यांची शेवटच्या श्वासापर्यंत ओळख राहिली. वयाच्या 25 व्या वर्षांपासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. ते 1978 ते 1985 या काळामध्ये जिल्हा काँग्रेस जनरल सेक्रेटरी होते. तेथून त्यांच्या राजकीय प्रवासाचा पाया रचला गेला. त्यानंतर 1986 ते 1990 या कालावधीमध्ये त्यांनी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष भूषवले. 1999 ते 2019 अशी 20 वर्ष त्यांनी कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद भूषवले. त्यांनी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपदी भूषवले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला समजला होता. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.
आमदारकीला दोनदा हुलकावणी, पण तिसऱ्यांदा विजय खेचून आणला
पी. एन. पाटील यांनी जिल्हा काँग्रेसमध्ये सक्रिय असतानाच ते पहिल्यांदा 1995 मध्ये आमदारकीच्या रिंगणात उतरले. 1995 मध्ये तत्कालिन सांगरुळ विधानसभा मतदारसंघात पी. एन. पाटील यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना संपतराव पवार यांच्याकडून सलग दोनवेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र, सलग दोन पराभवातून हार न मानता 2004 मध्ये त्यांनी विजयश्री खेचून आणली होती. संपतराव पवार यांची हॅट्ट्रिक रोखत पी. एन. पाटील यांनी पहिल्यांदा आमदारकी मिळवली होती. यानंतर 2004 आणि 2014 मध्ये करवीर विधानसभेतून त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागल्यानंतर 2019 मध्ये त्यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणली होती. त्यामुळे पराभवातून विजय हे त्यांचे समीकरणच राहिले.
सलग 30 वर्ष राजीव गांधी सद्भभावना दौड, सहकारातही आदर्श नेतृत्व
आमदार पी. एन. पाटील यांनी जिल्हा काँग्रेसमधून राजकारणातून पाया रचताना सहकारामध्येही पाय रोवत आदर्श घालून दिला. स्थापन केलेली कोणत्याच संस्थेचा त्यांनी डाग लागू दिला नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भोगावती साखर कारखाना, राजीवजी गांधी सुतगिरणी, श्रीपतरावदादा बँक, निवृत्ती तालुका संघ या माध्यमातून सहकारामध्येही त्यांनी आदर्श नेतृत्व दिले. पी. एन. पाटील यांनी दिंडनेर्लीमध्ये आमदार होण्यापूर्वीच सुतगिरणी स्थापन करुन तरुणांच्या हाताला काम दिले होते. या सुतगिरणीला राजीव गांधी यांचे नाव दिलेच, पण गेल्या 30 वर्षांपासून अविरत त्यांच्या जयंतदिनी कोल्हापूर ते दिंडनेर्ली सद्भभावना दौड आयोजित करुन आदर्श प्रस्थापित केला.
आयुष्यभर 'काँग्रेसमन', विलासरावांचे खंदे समर्थक
पी. एन. पाटील यांनी राजकारणाची सुरुवात केल्यापासून ते आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा झेंडा कधीच खाली ठेवला नाही. राजकीय जीवनात अपयश येत असतानाही त्यांनी कधीच पक्षावरील निष्ठा कमी होऊ दिली नाही. काँग्रेस पक्षामध्येही 1999 मध्ये वादळ आल्यानंतर त्यांनी कधीच पक्षाशी दोन हात केले नाहीत. त्यामुळे त्यांची काँग्रेसमन अशीच ओळख झाली. स्वर्गीय विलासराव देशमुखांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख होती. विलासरावांच्या कार्यकाळात जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत होती तेव्हा तेव्हा पी. एन. पाटील यांच्या मंत्रिपदाची चर्चा रंगली. मात्र, मंत्रिपदाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या