Kolhapur News: प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या आणि फक्त मुदतवाढ मिळत चाललेली कोल्हापूर शहराची थेट पाईपलाईन तसेच इतर विविध प्रश्न संदर्भात आज (4 मे) आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी मनपा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. थेट पाईपलाईन संदर्भातील प्रलंबित कामे मे अखेर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी दिल्या. वेळ काढूपणा करू नका, संबंधितांनी गांभीर्याने घ्यावं, कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. युनिटी कन्सल्टंटचे विजय मोहिते यांनी, बिद्री सब स्टेशनपासून काळमवाडीपर्यंतची वीज कनेक्शन बाकी असल्याचे सांगत बिद्री साखर कारखान्यापासून चार किलोमीटर अंडरग्राउंड लाईन नेण्याचे काम बाकी असल्याचं सांगितलं. यावर आमदार ऋतुराज पाटील यांनी महावितरणकडून ज्या परवानग्या आवश्यक आहे त्या तातडीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. प्रत्येक बैठकीला वेगळा मुद्दा उपस्थित करू नका, बैठकीमध्ये ज्या सूचना केल्या आहेत त्याची पूर्तता करून पुढील बैठकीत याबाबत माहिती देण्याची सूचनाही त्यांनी केली. 


जॅकवेलचे काम अद्यापही प्रलंबित असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत जाणीवपूर्वक हा प्रकल्प संबंधित कंपनी लांबणीवर पाडत आहे का? अशी विचारणा जाधव यांनी केली. एक नंबर जॅकवेलचा टॉपचा स्लॅब 16 दिवसात तर दुसऱ्या जॅकवेलचा फ्लॉवरचा स्लॅब 31 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार जयश्री जाधव यांनी केली. नगरोत्थान व दलित वस्ती योजनेतून आम्ही सुचवलेली कामे डावलून इतर कामांची यादी कोणाच्या सांगण्यावरून तयार केली, आम्ही सुचवलेले कामे डावलण्यामागचे कारण काय अशी विचारणा जयश्री जाधव आणि ऋतुराज पाटील यांनी केली. आम्ही सुचवलेल्या कामाचा समावेश न केल्याबाबत लेखी खुलासा महापालिकेने त्वरित द्यावा, अन्यथा अधिकाऱ्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुचवलेली कामे आणि त्यातील प्रत्येक कामाचे नाकारण्याचे कारण याचा लेखी खुलासा उद्या सकाळपर्यंत द्यावा अशी सूचना करण्यात आली आहे. 


कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा पूर्णता विस्कळीत झाला आहे. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाणी उपसा जास्त होत असतानाही पाणीपुरवठा सुरळीत का होत नाही? असा प्रश्न करत आमदार जयश्री जाधव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरांच्या नागरिकांच्या तक्रारी येत असताना अधिकारी नागरिकांना उडवाउडवीची उत्तर देतात हे बरोबर नाही. महापालिका प्रशासनाने कार्यप्रणालीत बदल करून त्वरित नागरिकांना योग्य वेळेत पाणी मिळेल तसेच पाणीपुरवठा होत नसल्यास टँकरने सर्व भागात पाणीपुरवठा मिळाले पाहिजे याबाबतचे नियोजन करावे, असे जाधव यांनी सांगितले. 


पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची सफाई करून घ्या


नालेसफाई करताना बाजूला ओढून लावलेला कचरा भरून न्या, तसेच नालेसफाई झाल्यानंतर कनिष्ठ अभियंता, स्थानिक नागरिक व आरोग्य निरीक्षक यांनी जागेवर पाहणी करून सह्या घ्या असेही आमदार जाधव यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या