Kolhapur News: मामाच्या मुलीच्या लग्नासाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा कारचा ताबा सुटून झाडाला आदळून झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. जवान मसणू धोंडीबा मणगुतकर (वय 32) असे त्यांचे नाव आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील राज्य मार्गावर किणे हद्दीत मसणू यांची भरधाव वेगातील कार झाडाला धडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते मुळचे तावरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील आहेत. ते अविवाहित होते. सुट्टीवर आल्यानंतर जवानाचा पहिल्याच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने गावासह  संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. बुधवारी हा अपघात घडला.


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार जवान मसणू मणगुतकर हे एक महिन्याच्या सुट्टीवर आले होते. त्यांच्या मामाच्या मुलीच्या विवाहासाठी अल्टो कारने (एमएच-06-एएस-8556) आईला हडलगे गावी सोडल्यानंतर आजऱ्याच्या दिशेने निघाले होते. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने थेट झाडाला जाऊन धडकली. या अपघातात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर सैन्य दलातील अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. 


मसणू यांचे तुकाराम कोलेकर वरिष्ठ महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण झाले होते. त्यांच्या पश्चात आई वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. अपघाताची नोंद नेसरी पोलिसात झाली आहे. मसणू यांना पहिल्यापासून सैन्याची आवड होती. 2014 मध्ये ते सैन्यात भरती झाले होते. त्यांनी शीख रेजीमेंटमधून लेह लडाख, लखनौ या ठिकाणी पाच वर्षे सेवा बजावल्यानंतर  सध्या ते विशाखापट्टनममध्ये सेवेत होते.


लग्न ठरवण्यासाठी 15 दिवसांपूर्वीच सुट्टीवर आलेल्या जवानाची आत्महत्या


दरम्यान,  चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झालेल्या अविवाहित जवानाने एप्रिल महिन्यात सुट्टीवर घरी आल्यानंतर गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (वय 23) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी तनवडीमध्ये (ता.गडहिंग्लज) गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. वयाची पंचविशीसुद्धा पार न केलेल्या आणि चार वर्षांपासून देशाच्या सेवेत असणाऱ्या मुलाने असा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. पुण्यातील 109 इंजिनिअरिंग रेजिमेंटमधून ते लष्करात भरती झाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या