Chandrakant Patil : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. बहुप्रतिक्षित मुंबई-कोल्हापूर विमानसेवेवर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. 


चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर मुंबई विमानसेवेबाबत माहिती देताना सांगितले की, कोल्हापूर ते मुंबई आणि कोल्हापूर बंगळूर विमानसेवा सुरु तसेच मुंबईची सेवा सकाळी देण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. 


या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलवून घेतले होते. कारण कोल्हापूर-मुबंई विमानसेवा सुरु होण्यासाठी स्लाॅट मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अदानी व्यवस्थापनाकडून 5 ऑक्टोबरपासून सकाळचा स्लाॅट देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे नवरात्रीत अंबाबाई दर्शनासाठी अतिशय मोठ्या गर्दीने येतात ती मोठी भेट मुंबईला मिळेल. सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापुरातून मुंबईला विमान जाईल.  कोल्हापूर-बंगळूर विमानसेवाही सुरु होईल, असेही पाटील यांनी सांगितले.


अकासा आणि स्टार एअरलाईन्सने सकाळी जाण्यासाठी आणि संध्याकाळी येण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार अदानी ग्रुपने त्याला परवानगी दिल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. गोव्याला सुद्धा कनेक्टिव्ही असावी यासाठी मागणी केल्याचेही महाडिक यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच मुंबई, बंगळूर आणि गोवा या विमानसेवा सुरु होतील, अशी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.  


आठवड्यातून पाच दिवस विमानसेवा सुरु राहिल. अकासा आणि स्टार एअरलाईन्सने 15 दिवसांत विमानसेवा सुरु करण्याची ग्वाही दिल्याचे महाडिक म्हणाले. दोन स्लाॅट मिळाल्यास दोन्ही  कंपन्यांकडून विमानसेवा सुरु होतील. स्टार एअरलाईन्सला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. 


विमानतळ छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यावरूनही बैठकीत चर्चा झाल्याचे महाडिक म्हणाले. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अजेंड्यामध्ये कोणताही उल्लेख नसल्यान त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलेलं नाही. मात्र, या संदर्भात आपल्या कार्यालयाकडून माहिती घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले असल्याचे  महाडिक म्हणाले.