Kolhapur Crime : गणपतीचा महाप्रसाद सुरु असतानाच पाणी घातल्याच्या संशयातून दोन गटात झालेल्या वादामध्ये थेट 12 बोअरच्या बंदुकीतून गोळीबार केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मांडरे गावात घडली. भावकीतील वाद महाप्रसादात उफाळून आल्याने हा प्रकार घडला. भांडणात दगड काठ्यांचा मारहाण झाल्याने पाच जण जखमी झाले. या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली आहे. 


अभिजित सुरेश पाटील, समीर कृष्णात पाटील, सुरेश रामचंद्र पाटील, बाजीराव पांडुरंग पाटील, विशाल बाजीराव पाटील, विकास बाजीराव पाटील, दादासाहेब श्रीपती पाटील, प्रकाश शंकर भावके, सर्जेराव शंकर भावके, स्वरूप सुरेश पाटील, राहूल कृष्णांत पाटील आणि तुषार राजाराम पाटील (सर्व रा. मांडरे, ता. करवीर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे सिंदकर यांनी सांगितले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदय सोनबा पाटील हे मांडरे गावात राहतात. गावातील एका तरुण मंडळाने गणपतीचा महाप्रसाद ठेवला होता. या प्रसादामध्ये संशयितांनी पाणी घातलेच्या कारणावरून उदय पाटील यांच्यासह नातेवाईकांचे आणि संशयितांमध्ये भांडण झाले. 


यावेळी संशयित अभिजितने बंदूकीचा परवाना नसतानाही 12 बोअरच्या बंदूकीतून उदय पाटील यांच्यावर गोळी झाडली, पण ते वेळीच बाजूला झाल्याने  अनर्थ टळला. मात्र, यानंतर झालेल्या दगड काठ्यांच्या हाणामारीत उदय, संग्राम, रंगराव, अनिल आणि रोहित पाटील असे पाच जण जखमी झाले आहेत. फिर्याद जखमी उदय पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार 12 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 


10 जणांना पोलिसांकडून अटक, चार दिवसांची पोलिस कोठडी 


पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करताना 10 जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी गावात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. मांडरे ग्रामस्थांनी वाद पेटल्यानंतर तत्काळ माहिती पोलिसांना दिल्याने मोठा अनर्थ टळला. 


इतर महत्वाच्या बातम्या