Bharati Pawar In Kolhapur : प्रत्येकाने शहरात थांबायचे मग ग्रामीण भागात काम कोण करणार? अशी शब्दात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सीपीआरमधील डॉक्टरांना खडे बोल सुनावले. भारती पवार आज कोल्हापूरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी सीपीआरमध्ये आढावा बैठक घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. पवार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर भडकलेल्या दिसून आल्या.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी सीपीआरमध्ये झालेल्या आढावा बैठकीला खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. भारती पवार यांनी गरिबांची सेवा करायला डॉक्टर होता, पण डॉक्टर झाला की विसरून जाता, अशा शब्दात हल्ला चढवला. 70 वर्षांपूर्वीचा जमाना आता गेला असून डॉक्टर नसतील तर त्यांचे रोटेशन लावा, असे त्यांनी सुनावले. मशीन आहे आणि डॉक्टर नाही, असेही त्य म्हणाल्या. मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखायचे असेल तर तुमचा निष्काळजी पणा कसा चालेल? मी इथून जायच्या आधी मला डॉक्टरांचे रोटेशन लावून हवं आहे.
आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा
दुसरीकडे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेची पोलखोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांनी केली. भारती पवार उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात (Osmanabad District Hospital) गेल्या असता, शासकीय रुग्णालयात औषधं उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यांना खासगी रुग्णालयातून औषधं खरेदी करण्यास सांगितली गेली. यावरुनच भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं. नागरिकांनी देखील यावेळी अनेक तक्रारी केल्या.
तानाजी सावंत हे राज्याचे आरोग्य मंत्री आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पोलखोल केली. शासकीय रुग्णालयात औषधं उपलब्ध नसल्याचे समोर आलं आहे. जिल्हा रुग्णालयाकडून खासगी मेडिकलमध्ये जाण्याचा सल्ला भारती पवार यांना देण्यात आला. त्यानंतर मंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं.
नेमकं काय म्हणाल्या भारती पवार?
केंद्र सरकारनं काही नियम ठरवून दिले आहेत. त्या नियमांनुसार प्रत्येक शासकिय रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध असली पाहिजेत. प्रत्येक राज्याच्या मागणीनुसार औषधांसाठी बजेट दिलं जात असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या. जेव्हा मी उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिली तेव्हा लक्षात आले की, तिथे काही औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळं तत्काळ बैठक घेण्यात आली. या बैठकीत तत्काळ औषधांची खरेदी करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती भारती पवार यांनी दिली. रुग्णांना बाहेरुन औषधे विकत न आणण्याची वेळ येऊ नये अशाही सूचना दिल्या आहेत. आमचा आग्रह आहे की, सगळी औषधे रुग्णालयात मिळाली पाहिजेत असेही त्या म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या