Kolhapur News: लोकसभा निवडणुकीमध्ये झालेली चूक सुधारताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रितपणे लढवणार आहेत. आज (10 नोव्हेंबर) जयसिंगपूरमध्ये झालेल्या बैठकीत कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी शिरोळ तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याची घोषणा केली. शिरोळ तालुक्यामध्ये जयसिंगपूर, शिरोळ, आणि कुरुंदवाड नगरपरिषदासह जिल्ह्यातील निवडणुका महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रित लढवणार आहे. 

Continues below advertisement


दोन दिवसात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करणार 


दरम्यान, आघाडीची घोषणा करताना सतेज पाटील यांनी राजू शेट्टींसोबत एकत्रित निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. तसेच दोन दिवसात नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जयसिंगपूरमध्ये बिन आवाजाचा बाॅम्ब फुटणार असल्याचे पाटील म्हणाले. जयसिंगपूर शहरातील प्राॅपर्टी कार्डचा विषय आमची सत्ता येताच वर्षात मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. 






काही लोकांनी दुकानदारी उघडून ठेवली होती


दरम्यान, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रित आल्यानंतर स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला सुविधा देण्यापेक्षा काही लोकांनी दुकानदारी उघडून ठेवली होती. ती दुकानदारी मोडून काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याच ते म्हणाले.  शिरोळ तालुका कोणाच्या बापाचा असल्याचा कोणीही गृहीत धरू नये, असा हल्लाबोल त्यांनी केला. ते म्हणाले की, केवळ शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आली आहे. विकासकामांच्या नावाखाली जयसिंगपूरमध्ये अनेकवेळा भ्रष्टाचार झाल्याने आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात प्रॉपर्टी कार्डच्या नावाखाली अनेक निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. मात्र, आता जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नसल्याचा टोला त्यांनी लगावला. 


चंदगड तालुक्यात भाजपला कात्रजचा घाट, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र


दुसरीकडे, चंदगड तालुक्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला दूर सारत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणत राजकीय चकवा दिला आहे. चंदगडला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंदगडमधील कुपेकर गट आणि राजेश पाटील यांना एकत्र आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या