Maharashtra Budget 2023 : बहुप्रतीक्षित राज्याचा अर्थसंकल्प आज (9 मार्च) सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. बजेटमधून अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतानाच शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर 6 हजार मदतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता वर्षाकाठी शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळतील. या योजनेतून 1.15 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल.  


या योजनेमुळे राज्य सरकारवर 6 हजार 900 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे या मदतीला नाव देण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूरसाठी (Kolhapur News) या बजेटमध्ये फार मोठं हाती लागलेलं नाही. चित्रनगरी आणि मनोरुग्णालयासाठी तरतूद तसेच, कोल्हापुरी चप्पल क्लस्टर आणि शक्तीपीठ महामार्गासाठी करण्यात आलेली तरतूद वगळता कोल्हापूरसाठी ठोस काही हाती लागलेलं नाही. शाहू मिलमधील शाहू स्मारक उपेक्षित राहिलं आहे. अर्थसंकल्पातून दादासाहेब फाळके आणि कोल्हापूर चित्रनगरीमध्ये आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी 115 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. तसेच ठाणे आणि कोल्हापुरात अत्याधुनिक मनोरुग्णालयांसाठी 850 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 


शक्तीपीठ महामार्गासाठी तरतूद 


गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी 86 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे धार्मिक पर्यटन एकाच महामार्गावरून होणार आहे. दुसरीकडे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता करून वाढवण्यात येणार आहे. पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गासाठी 86 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 


शक्तीपीठ महामार्गातून माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, आंबेजोगाई ही शक्तीपीठे तसेच औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी औदुंबर जोडले जाणार आहे. या महामार्गाचा विस्तार हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधून होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या