Kolhapur Nagar Palika Election:स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका समजल्या जात असल्या, तरी कोल्हापूरमध्ये मात्र नेत्यांच्या अभद्र आघाड्या मात्र हाडाच्या कार्यकर्त्यांना कात्रजचा घाट दाखवत आहेत. कागलमध्ये थेट कट्टर राजकीय वैरी असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीसिंह घाटगे एकत्र आल्यानंतर आता शिरोळ तालुक्यामध्ये सुद्धा थेट महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांची ताराराणी आघाडी आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचा काँग्रेसचा गट सुद्धा एकत्र आल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. सोयीनुसार नेत्यांकडून होत असलेल्या आघाड्यांमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी या निवडणुकीच्या निमित्ताने झाली आहे.
शिरोळ तालुक्यामध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र
शिरोळ तालुक्यामध्ये जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याने कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात शिरोळ तालुक्यामध्ये विरोधकांनी मोठ बांधली आहे. यापूर्वीच काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुद्धा सोबत घेत शिरोळ तालुक्यातील निवडणूक एकत्रित लढवण्याचे जाहीर केलं होतं. त्यामुळे यड्रावकरांविरोधात विरोधकांनी तगडं आव्हान उभ केल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिंदे सेना या ठिकाणी एकाकी पडल्याचे चित्र आहे. कागलमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांची कोंडी झाली असतानाच शिरोळ तालुक्यामध्ये विरोधक एकवल्याने यड्रावकर यांची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापुरात झालेल्या आघाड्या
- मलकापूर नगर परिषदेत आमदार विनय कोरे यांनी आणि माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या लढत आहे.
- पेठवडगाव नगरपालिकेमध्ये आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष व महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीच्या वतीने प्रविता सालपे या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत. त्यांना विद्याताई पोळ यांच्या नेतृत्वाखालील यादव पॅनलने आव्हान दिलं आहे.
- पन्हाळ्यात आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्य, भाजप-शिव शाहू आघाडी, शाहू आघाडी यांना एकत्र आणत आघाडी केली आहे. दुसरीकडे, अपक्षांना एकत्र करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आव्हान देण्यात आलं आहे.
- चंदगडमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीसह काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.
- गडहिंग्लजमध्ये भाजपने जनता दलाशी आघाडी केली आहे. त्यांना शिंदे सेनेने साथ दिल्याचे चित्र आहे
- हातकणंगलेत महायुती व महाविकास आघाडी फुटली असून नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटत नसल्याने सर्वच पक्ष स्वबळ आजमावणार आहेत
- कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर नगरपालिकेत सर्वपक्षीय शाहू आघाडीने भाजपला आव्हान दिलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या