Mahadevrao Mahadik on Hasan Mushrif: कोल्हापूर जिल्हा दूध सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये संचालक मंडळाची संख्या 21 वरून 25 करण्याच्या निर्णयावर विरोधी महाडिक गटाने कडाडून हल्लाबोल केला आहे. महाडिक गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गोकुळमधील नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती प्रहार केला आहे. जर चांगला कारभार केल्याच्या डांगोरा पेटवत आहात, तर तुम्हाला टोकन देण्याची वेळ का आली? असा खडा सवाल महादेवराव महाडिक यांनी हसन मुश्रीफ यांना केला आहे. हा पायंडा चुकीचा असल्याचे महाडिक यांनी म्हटलं आहे.
तर निवडणुकीमध्ये प्रलोभनाची गरज नाही
महादेवराव महाडिक म्हणाले की, चार वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत गोकुळची सत्ता घेण्यात आली. मात्र राजकीय सोयीसाठी संचालकांची संख्या 25 करणे कितपत योग्य आहे? यामध्ये संचालकांचा खर्च वाढणार असून यामध्ये दूध उत्पादकांचा काय फायदा आहे अशी विचारणा त्यांनी केली. गोकुळ उत्पादकांच्या कामावर मोठा झाला आहे. त्याचे श्रेय कोणी घेऊन असे महाडिक म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की कोणत्याही संस्थेमध्ये सहकारी विश्वासाने काम केलं, तर निवडणुकीमध्ये प्रलोभनाची गरज नाही. मात्र निवडणुकीच्या तोंडावर टोकन दिलं जात आहे. त्यासाठी मंत्री, आमदार हे सुद्धा फिरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक स्वाभिमानी असून तुम्ही चांगले काम केलं, तर तुमच्या सोबत डोळे झाकून राहतो असेही ते म्हणाले.
5 ते 10 मिनिटात करून हा निर्णय घेण्यात येवू नये
दरम्यान, गोकूळ संचालिका शौमिका महाडिक यांनीही संचालक वाढीवर आक्षेप घेत तोफ डागली आहे. त्यांनी या निर्णयाला विरोध करत पत्र संघाला लिहिलं आहे. शौमिका महाडिक यांनी म्हटलं आहे की, गोकूळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांची संख्या 21 वरुन 25 करण्याचा ठराव ठेवण्यात आला आहे. मात्र, या ठरावाला विरोध करत याबाबतच पत्र संघाकडे दिलं आहे. गोकूळ दूध संघाच्या संचालकांची संख्या वाढवण्याचा निर्णय फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत रुटींगच्या विषयामध्ये याची चर्चा 5 ते 10 मिनीटात करून हा निर्णय घेण्यात येवू नये. यासाठी वरिष्ठ नेतृत्वासोबत बैठक झाली पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे अशी आपली भूमिका आहे.
संघावर बोजा पडणार आहे का?
पण हा निर्णय घेण्यामागे नेमकी नेत्यांची भूमिका काय आहे? याचा गोकूळ दूध संघाला काय फायदा होणार आहे का? हा निर्णय घेतल्यानंतर संघावर बोजा पडणार आहे का?. गोकुळच्या हिताचा निर्णय आहे का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा होणं गरजेचं असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. संचालक वाढीचा निर्णय जर गोकुळच्या हिताचा असेल, भविष्यात गोकुळसाठी उपयोगी पडणारा हा निर्णय असेल तर माझी ही त्याला संमती असेल आणि विरोधाचं पत्र मी मागे घेईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
निवडणुकीत याचा प्रभाव पडणार
त्यांनी पुढे म्हटले आहे की, गोकूळ दूध संघाच्या संचालक वाढीचा निर्णय महत्त्वाचा असून येणाऱ्या निवडणुकीत याचा प्रभाव पडणार आहे. चर्चा करून करून हा निर्णय व्हावा. संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यास माझा विरोध आहे. मात्र गोकुळमध्ये महायुतीत एकमत नसल्याचे तर्क काढले जात आहेत. चार लोकं एकत्र आले की, प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात त्यामुळे आपलं वेगळं मत मांडण म्हणजे लगेच विरोधक झालो असा त्याचा अर्थ होत नाही. गोकूळमध्ये सावकर साहेब, मुश्रीफ आणि नरके साहेब ही सहकारातील मंडळी आहेत त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे, पण त्यांचा अनुभव वेगळा असू शकतो. माझा अनुभव वेगळा असू शकतो, त्यामुळे मी माझं मत व्यक्त केलं संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय ठेवला म्हणजे मंजूर झाला असं नाही. त्यासाठी पुढे मोठी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत आमची वरिष्ठांसोबत बैठकही होणार आहे. तिथं संचालक वाढीचा निर्णयाची अंमलबजावणी होईल. वरिष्ठांच्या चर्चेअंती जो निर्णय होईल तो आम्ही सर्व महायुतीचे सदस्य एकमताने मंजूर करु.
इतर महत्वाच्या बातम्या