Bhagat singh koshyari : राज्यासाठी नव्हे, तर देशासाठी वंदनीय असलेल्या महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करण्याची मालिकाच सुरु केलेल्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हकालपट्टीसाठी आज कोल्हापुरात शिवाजी पेठेत लिंबूमार आंदोलन करण्यात आले. शिवभक्त लोकआंदोलन समिती आणि कोल्हापूर जिल्हा दांड-पट्टा,लाठी असोसिएशनकडून लिंबूमार आंदोलन करण्यात आले. शिवाजी पेठेतून यावेळी निषेध मोर्चाही काढण्यात आला. 


यावेळी राज्यपालांचा (morcha against bhagat singh koshyari in kolhapur) धिक्कार करण्यात आला. सरदार तालमीपासून मोर्चास प्रारंभ झाला. उभा मारुती चौकातून निघालेल्या मोर्चाची निवृत्ती चौकात सांगता झाली. लिंबूमार आंदोलनाने मोर्चाची सांगता करण्यात आली. निवृत्ती चौकामध्ये लिंबूमार आंदोलनात असोसिएशनच्या मावळ्यांनी कोश्यारी यांच्या प्रतिमेवरील लिंबू तलवारीने कापून निषेध केला. यावेळी कोल्हापूर जिल्हा दांड-पट्टा असोसिएशनचे वस्ताद पंडितराव पोवार, मराठा महासंघाचे कार्याध्यक्ष वसंतराव मुळीक, बबनराव रानगे, शंकर शेळके, श्रीकांत भोसले, नाना सावंत, विनोद साळोखे, सूरज ढोली, अमोल बुचडे, योगेश गुंजेकर उपस्थित होते.


महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा


दरम्यान, महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात विरोधात हल्लाबोल ही लाईन डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी (MVA) 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. यासाठी शिवसेना (ठाकरे गट ) राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कार्यकर्त्यांना जमवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षाने एक लाखाचं टार्गेट ठेवून जवळपास तीन लाखांहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट ठेवलं आहे. या ऐतिहासीक विराट मोर्चासाठी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत. भाजप नेते आणि राज्यपालांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान तसेच सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 


‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही; राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यानं चर्चा


दरम्यान, ‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, असं वक्तव्य कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी शुक्रवारी पुण्यातील डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या वतीने वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं. कोश्यारींच्या या वक्तव्यामुळं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज्यपालांचे भाषण सुरु झाल्यानंतर त्यांच्या समोरील बाजूला व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्याच्या मागे एक महिला बसली होती. त्या महिलेला व्यासपीठावरील राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे तिने राज्यपालांना दुसर्‍या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचं आहे, असा मिश्किलपणे प्रश्न विचारताच सभागृहात एकच हशा पिकला. कोश्यारी पुढे म्हणाले की, ‘मैं मानता ही नहीं हूं की, मैं राज्यपाल हूँ’ तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार. तुम्ही बोला’ असं राज्यपाल म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या