kolhapuri Chappal : कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत कोल्हापुरी चप्पलने (kolhapuri Chappal) एखाद्याचा उद्धार करण्यासाठी (खास करून पायताण म्हणत) दिवसातून कितीतरीवेळा उल्लेख होत असेल, त्याचा अंदाज बांधणे कठिण आहे. त्यामुळे रुबाब मारण्यासाठी आणि रुबाब उतरवण्यासाठी कोल्हापुरी चप्पल पुरेसं आहे असंही म्हणतात. याचा अर्थ कोल्हापुरी चप्पल हे जीवघेणं हत्यार नाही. याच मुद्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खटला रद्द केला आहे.
अर्थात, कोल्हापुरी चप्पल हे पायात घालण्याचे वाहन आहे. त्यामुळे त्याची ख्याती सर्वदूर पोहोचली आहे. मात्र, औरंगाबादमध्ये झालेल्या एका प्रकरणात कोल्हापुरी चपलेवरून वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पोहोचला. यामुळे कोल्हापूरी चप्पल न्यायालयात चर्चेचा विषय झाला. मात्र, न्यायालयाने कोल्हापुरी चप्पलची निर्दोष मुक्तता केल्याने जगभरातील कोल्हापुरी चप्पलप्रेमींचा आणि समस्त कोल्हापूरकरांचा जीव भांड्यात पडला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
वादाला सुरुवात कशी झाली?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये मंगेश देशमुख आणि त्यांची पत्नी श्रद्धा यांनी कोल्हापुरी चपलेने अनंत देशमुख यांना मारहाण केली. कोल्हापुरी चपलेने झालेल्या मारहाणीनंतर अनंत देशमुख यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मारहाण करणाऱ्या मंगेश आणि श्रद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, कोल्हापुरी चपलेने गंभीर दुखापत कशी होईल? असा मुद्दा उपस्थित करत त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. यानंतर दोघांची आरोपांतून मुक्तता करण्यात आली. आरोपमुक्त करताना न्यायालयाने कोल्हापुरी चप्पलला 'जीवघेणे हत्यार' नाही, असा स्पष्ट निर्वाळा दिला. त्यामुळे पायातील वाहन असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलची न्यायालयीन वारी चांगलीच चर्चेत आली.
जगात भारी कोल्हापुरी चप्पल
कोल्हापूरचा तांबडा पांढरा, कुस्ती, गुळ, कोल्हापुरी साजाप्रमाणेच कोल्हापुरी चप्पलही सातासमुद्रापार पोहोचली आहे. ही चप्पल घातल्यानंतर पायातून कर्र कर्र असा आवाज येत असतो. यासाठी विंचू नावाच्या वनस्पतीच्या बिया वापरल्या जातात. त्यामुळे कोल्हपुरातील सर्वोच्च भेटवस्तू म्हणजेच कोल्हापुरी चप्पल आहे. ज्याची बांधणी कोणत्याही मशीनशिवाय कारागिरांकडून कौशल्याने केली जाते. त्यामुळे ती आकर्षित करणारी असते. तसेच कोल्हापुरी चप्पलचा टिकावूपणा या दोन गोष्टींमुळे या चपला जगप्रसिध्द झाल्या आहेत.
- ही चप्पल टिकाऊ, वापरासाठी आरामशीर आणि आकर्षक रंगात मिळतात.
- कोल्हापुरी चप्पलची बांधणी 100 टक्के चमड्यापासून केली जाते.
- त्यामुळे उष्ण वातावरणात घाम आणि उष्णता शोषून पायाला गारवा जाणवतो.
- वापरासाठी मऊ आहेत.
- कोठेही नेणेसाठी या चपला सुंदर, हलक्या व किफायतशीर आहेत.
- सर्व आकारात उपलब्ध आहेत. (स्त्री व पुरूषांसाठी)
- या चपला पायाचे सौंदर्य व सुरक्षितता वाढवतात.
इतर महत्वाच्या बातम्या