Kolhapur Crime : अल्पवयीन मुलाने केलेल्या वारंवार अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्ह्यातील इचलकरंजीत घडली. संशयित अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपी मुलाविरोधात बलात्कार, पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इचलकरंजी (Ichalkaranji News) पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदरची घटना घडली आहे.
पोलिसांनी (Kolhapur Police) दिलेली माहितीनुसार पीडिता आणि संशयित आरोपीची एका कार्यक्रमात ओळख झाली होती. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिच्याशी ओळख वाढवली होती. यानंतर त्याने त्या मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. तसेच पीडित मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास तिला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिताने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही. दरम्यान, पीडितेची प्रकृती बिघडली. त्यामुळे ती आईसोबत एका रुग्णालयात गेली. तपासणीनंतर डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले.
त्यानंतर पीडितेने आईसह शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन संशयित आरोपीच्या विरोधात बलात्कार, जीवे मारण्याची धमकी आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठविले आहे.
एकाच दिवसात दोन अल्पवयीन मुलींची प्रसूती
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींची प्रस्तुती झाल्याचा धक्कादायक प्रकार 8 फेब्रुवारी रोजी उघडकीस आला होता. कोल्हापूर शहरातील कसबा बावडा परिसरात एक घटना उघडकीस आली, तर दुसरी मोलमजुरीसाठी गिरगाव (ता. करवीर) आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
कसबा बावड्यामध्ये झालेल्या प्रसूतीमध्ये मुलीच्या पालकांनी बोगस आधारकार्डचा वापर करून प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाईल्ड लाईन तसेच जिल्हा महिला व बालकल्याण विकास विभागाने उघडकीस आणला. ही मुलगी सध्या 15 वर्षे 7 महिन्यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मजुरीसाठी गिरगावमध्ये आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका अल्पवयीन विवाहितेची प्रसूती झाली. या प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या