Kolhapur Weather : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur Weather) वैशाख वणव्याचे चटके जाणवू लागले आहेत. तापमानात वाढ झाल्याने उष्मा जाणवू लागला आहे. कोल्हापुरातील तापमान 40 अंशावर गेल्याने दुपारच्या सत्रातील वर्दळीवरही त्याचा परिणाम झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील अचानक बदल सातत्याने जाणवू लागले आहेत. सकाळ धुके, बोचरी थंडी दुपारी उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी ढगाळ वातारवण होऊन तापमानात घसरण अशा विचित्र वातावरणाचा सामना करावा लागला आहे. 


उष्णतेची लाट येण्याची शक्यता 


दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील तापमान 39 अंशांवर राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात उष्णतेची लाट येण्याची आहे. तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 


15 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता


दुसरीकडे, हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  


विदर्भात पारा 39 अंश सेल्सिअस पार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडाही तापला 


दुसरीकडे विदर्भातील अनेक जिल्ह्यात पारा 39 अंश सेल्सिअस पार गेला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा देखील तापला आहे. तर जळगाव, परभणी आणि सोलापुरात पारा चाळीशी पार पोहोचला आहे. दरम्यान आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळीचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी गिरपिटीची देखील शक्यता वर्तवली आहे.


अवकाळी पावसाचा भाजीपाल्यासह फळबागांना फटका 


दुसरीकडे, मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal rain) कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, आजरा आणि चंदगड तालुक्याला झोडपून काढले होते. यामुळे काजू, आंबा, भाजीपाल्याला मोठा फटका बसला आहे. शाहूवाडी तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी सरपंच वंदना ठोंबरे यांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शाहूवाडी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने प्राथमिक शाळांची छते, घरांची पडझड, याशिवाय मका, केळी, नारळ फळबाग, विद्युत पोल यांची पडझड झाली आहे. महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करावेत. दुसरीकडे, चालू हंगामात ऊस गाळपाबरोबरच साखर उत्पादन आणि उताऱ्यातही मोठी घट झाली आहे. ऊसाची वाढ होत असतानाच सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर विभाग वगळता इतरत्र गाळप व साखर उत्पादनात 20 टक्के घट झाली. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही याचा दहा टक्के परिणाम झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या