कोल्हापूर: विकास आराखडा नेत्यांच्या बांधावरून जातो... आमच्या पोटातून जातो... अशी भावना कोल्हापूर जिल्ह्यातील वडगावच्या नागरिकांची आहे. शहराचा विकास आराखडा (Wadgaon Development Plan) सादर करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये बहुतांश त्रुटी राहिल्या असून या विकास आराखड्याला शहरवासियांनी कडाडून विरोध केला आहे. वडगावच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली आता नागरिकांनी या प्रश्नी लढा सुरू केला आहे. 


शहराच्या वाढीसाठी विकास आराखडा महत्वाचा आहे. पण त्यासाठी खापऱ्या फोडून देव कशाला करता? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. शासनाच्या विकास आराखड्यात अनेक त्रुटी असून त्या दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. शेकडो वर्षांपूर्वीचा मठ, शेकडो वर्षांपूर्वीचा दर्गा इतकंच नाही तर धरणग्रस्तांना मिळालेल्या जमिनी देखील या विकास आराखड्यामुळे उद्ध्वस्त होणार आहेत. 


ज्या पद्धतीने मठ, मंदिरं, जुने वाडे यांच्यावर आरक्षण टाकण्यात आलं आहे तसं बाजारपेठेतही घोळ झाला. नेत्यांनी आपला व्यवसाय वगळून इतर दुकानदारांना फटका बसेल असा आराखडा बनवल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला. 


चुकीच्या पद्धतीन रस्ते दाखवले


वडगावचे नगरसेवक गुरूप्रसाद यादव यावर बोलताना म्हणाले की, "गावाचा विकास व्हावा यासाठी विकास आराखडा बनवण्यात येतोय. पण वडगावचा विकास आराखडा हा त्याच्या मूलभूत संकल्पनेलाच अपवाद ठरतोय की काय अशी परिस्थिती आहे. विकास आराखड्यामध्ये पडलेले आरक्षण, चुकीच्या पद्धतीने अनावश्यक दाखवलेले रस्ते, एवढंच नव्हे तर धार्मिक स्थळांवरतीही रस्ते दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होतोय की काय अशी परिस्थिती आहे. आराखडा बनवताना तो सर्वसमावेशक असावा, पण या आराखड्यावरून तसं वाटत नाही."


वडगाव वाढीसाठी जो आराखडा करण्यात आला आहे त्यात नेत्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी अल्प-भूधारक शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारल्याची भावना व्यक्त करण्यात येतीय. इतकंच नाही तर धरणग्रस्त नागरिकांच्या जमिनीही उद्धवस्त करण्याचा घाट घातल्याचा आरोप होत आहे.


संसार वाचवणं गरजेचं: विद्याताई पोळ 


या सगळ्याबाबत सत्ताधारी असलेल्या नेत्यांवर टीका होत आहे. सत्तेत असलेल्या एका माजी नगराध्यक्षानी आराखड्यात चूक असल्याचे मान्य केले आहे. मात्र नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना राजकारण न करता अन्यायाविरोधात उभं राहीलं पाहिजे. राजकारण करण्यासाठी निवडणुका आहेत पण इथं संसार वाचवणं गरजेचं असल्याचं मत माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी व्यक्त केलं आहे.


विकास आराखड्यामध्ये दुरुस्ती करावी आणि राज्य सरकारने त्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी वडगावच्या नागरिकांची आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आणि महायुतीच्या कार्यकाळात देखील हे निदर्शनास आणून दिले, मात्र यावर तोडगा निघत नाही. त्यामुळे नागरिकांना आक्रमक होण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा देण्यात आला आहे.


ही बातमी वाचा: 



VIDEO : विकास आराखडा नेत्यांच्या बांधावरून नाही, आमच्या पोटातून जातो, वडगावकरांचा विरोध