Kolhapur Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा (Vidhan Sabha Election) निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur Vidhan Sabha Election) खणाखणी सुरू झाली आहे. काल (11 ऑगस्ट) रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौरा करताना कागल विधानसभा मतदारसंघातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर करत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून टाकला. यावेळी विविध विकासकामाचे लोकार्पणही करण्यात आले. यावेळी बोलताना विरोधकांना धडकी भरली पाहिजे इतक्या मतांनी हसन मुश्रीफ यांना निवडून द्या, असे आवाहन अजित पवार यांनी कागलमधील मेळाव्यामध्ये केले. महायुतीचा पहिला उमेदवार कागलमधून जाहीर झाल्यानंतरचा कागलमध्येच भाजपचा उमेदवार अडचणीत आला आहे. भाजप नेते समरजितसिंह घाटगे आता तुतारी फुंकणार की अपक्ष म्हणून पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये उतरणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 


कोल्हापूरमध्ये दहा विधानसभा मतदारसंघ येतात



  • चंदगड 

  • राधानगरी

  • कागल

  • कोल्हापूर दक्षिण

  • कोल्हापूर उत्तर

  • करवीर

  • शाहूवाडी

  • हातकणंगले

  • इचलकरंजी

  • शिरोळ


संख्याबळाने विचार केल्यास काँग्रेसचे सर्वाधिक आमदार


हातकलंगले विधानसभा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा आणि विधानपरिषदेवरील आमदारांचा विचार केल्यास आजघडीला काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत. अलीकडेच करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पी.एन. पाटील यांचे आकस्मिक निधन झाल्याने हा मतदारसंघ सध्या रिक्त आहे. आता त्या ठिकाणी थेट निवडणूक होणार आहे. 2022 मध्ये आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने कोल्हापूर उत्तरमध्ये पोटनिवडणूक पार पडली होती. या ठिकाणी चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या निवडून आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज यांनी विजय मिळवला होता.


एनडीए समर्थक आमदारांची संख्या सर्वाधिक


कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एनडीए समर्थक आमदार सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. सध्या एनडीएमध्ये शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे, जनसुराज्यचे आमदार विनय कोरे, कागलचे आमदार हसन मुश्रीफस, राधानगरीचे आमदार प्रकाश आंबिटकर, चंदगडचे आमदार राजेश पाटील आमदार आहेत. 


महाविकास आघाडी समर्थक आमदार कोण?


कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव, हातकणंगले आमदार राजू आवळे महाविकास आघाडी सोबत आहेत. विधानपरिषदेवर काँग्रेसचे सतेज पाटील आणि जयंत आसगावकर आमदार आहेत. 


कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमध्ये काय स्थिती?


कोल्हापूर उत्तरमधून (Kolhapur North) काँग्रेसकडून उमेदवार बदलला जाणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव या विद्यमान आमदार असल्या तरी त्या पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये उतरतील की नाही याबाबत साशंकता आहे. या ठिकाणी छत्रपती घराण्यातून माजी आमदार मालोजीराजे किंवा त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांच्यापैकी एकाला संधी दिली जाणार का याकडे सुद्धा लक्ष आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपकडून सत्यजित कदम, महेश जाधव आणि धनंजय महाडिक यांचे चिरंजीव इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघांमध्ये सुद्धा बॅनरबाजी सुरू झाली आहे. कोल्हापूर दक्षिण (Kolhapur South) मतदारसंघामध्ये सुद्धा चुरशीची लढत अपेक्षित आहे. या मतदारसंघांमधून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित मताधिक्य शाहू महाराजांना मिळाले नव्हते. त्यामुळे ऋतुराज पाटील यांच्यासमोर कडवं आव्हान असणार आहे. भाजपचे माजी आमदार अमल महाडिक हेच त्यांच्याविरोधात असतील अशी चिन्हे आहेत. धनंजय महाडिक यांचे चिरंजीवही उत्सुक आहेत. 


चंदगड आणि राधानगरी मतदारसंघात काय स्थिती? 


चंदगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश पाटील पुन्हा रिंगणात असतील अशी शक्यता आहे. भाजपकडून बरेच जण इच्छूक आहेत. शिवाजीराव पाटील, भरमू अण्णा पाटील, संग्रामसिंह कुपेकर यांचा समावेश आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जातो यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर व माजी सभापती अमरसिंह चव्हाण, दौलतचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील व गडहिंग्लजचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे, उद्धवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, ज्येष्ठ शिवसैनिक रियाज शमनजी, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील ही मंडळी इच्छुक आहेत.


राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर आहेत. विरोधात महाविकास आघाडीकडून माजी आमदार के पी पाटील इच्छुक आहेत. ए. वाय. पाटील यांनीही शड्डू ठोकला आहे.बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेची ठिणगी यापूर्वीच पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबिटकर आणि के पी पाटील यांच्यामध्ये चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. एकमेकांवर कारखान्यावर सुरू असलेल्या कारवाईवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. 


शाहुवाडीत लढत ठरल्यात जमा (Shahuwadi Vidhan Sabha)


शाहुवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा विनय कोरे आणि ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर यांच्यामध्येच लढत होण्याची अपेक्षा आहे. सत्यजित पाटील सरुडकर हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र त्यांना निसटता पराभव स्वीकाराव लागला. त्यामुळे विनय कोरे यांच्या विरोधात पुन्हा एकदा पाटील असण्याची शक्यता आहे. सत्यजित पाटील यांनी शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून लाखांवर मते घेतली होती. त्यामुळे या मतदारसंघातून ठाकरे गटाचे तेच उमेदवार असण्याची शक्यता आहे. 


हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजीमध्ये काय स्थिती?


हातकणंगले मतदारसंघामधून विद्यमान आमदार राजू आवळे काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. हातकणंगलेमध्ये शिवसेना ठाकरे कटाकडून माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्याकडून सुद्धा तयारी सुरू आहे. इचलकरंजीमध्ये प्रकाश आवाडे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात असतील. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोणाला संधी दिली जाते याकडे लक्ष आहे.


शिरोळमध्ये राजेंद्र पाटील हे विद्यमान शिंदे गटाचे आमदार असले तरी तुतारी हाती घेऊ शकतात अशीही चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला असला, तरी त्यानंतर ते क्वचितच जाहीरपणे दिसून आले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाशी त्यांची जवळीक पाहता ते पुन्हा एकदा तुतारी फुंकतात का अशीही चर्चा आहे.  या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उल्हास पाटील असतील, अशी शक्यता आहे. स्वाभिमानी उमेदवार देणार का? याचीही उत्सुकता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या