Murlidhar Jadhav On Dhairyasheel Mane : जर तुम्ही 18 वर्ष काम करणाऱ्या शिवसैनिकाला पदावरून बाजूला करणार असाल, तर तुम्ही काय सांगणार बाळासाहेबांचे विचार सांगणार आहात? उद्धव बाळासाहेब ठाकरे नावासाठी अशा 100 पदांचा त्याग करण्यास तयार आहे, अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी गोकुळमधील नियुक्ती रद्द झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली. हे कपटनीतीचे सरकार आहे, हे सरकार सर्वसामान्यांचे नसून  केवळ आपलं बघत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. 


कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकुळ) शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात गोकुळला आदेश प्राप्त झाला आहे.


मानेंना माजी खासदार केल्याशिवाय राहणार नाही 


मुरलीधर जाधव म्हणाले, हातकणंगलेचे खासदार उद्धवजींच्या नेतृत्वात निवडून गेले. मात्र, तळागाळातील, गावागावातील शिवसैनिक पेटून उठला आहे. तुम्हाला माजी खासदार म्हणून नाव लावावं लागेल एवढंच सांगतो. जिल्ह्यातीत तमाम शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. 


अशा 100 पदांचा त्याग करण्यास मुरलीधर जाधव तयार 


जाधव यांना गोकुळमधील नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर काही फरक पडला आहे का? असे विचारण्यात आले असता  म्हणाले की, बाळासाहेबांनी शिवसैनिक हे मोठ पद दिलं आहे. हे पद माझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे नावासाठी अशा 100 पदांचा त्याग करण्यास मुरलीधर जाधव तयार आहे. गोकुळसारखी पद येतील, जातील. मला काही फरक पडलेला नाही. 


मी माझं कर्तव्य केलं 


शिवसेनेत 40 आमदारांनी बंड केल्यानंतर त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यामध्येही उमटले. जिल्ह्यातून आमदार प्रकाश आबिटकर,माजी आमदार राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी शिंदे गटाशी घरोबा केला. त्यामुळे बंडखोरांविरोधात कोल्हापूरमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनी मोर्चे काढून त्यांना जाबही विचारला होता. यामध्ये शिवसेना मुरलीधर जाधव यांचाही समावेश होता. 


या पार्श्वभूमीवर केलेल्या आंदोलनाचा फटका बसला का? असे विचारले असता ते म्हणाले की, मी माझं कर्तव्य केलं. त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले, मंत्रिपद मिळवले आणि शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसायचा. हे माझ्यासारख्या शिवसैनिकाला सहन न होणारी गोष्ट आहे. त्यामुळे मी माझं कर्तव्य केलं. मला त्याचा पश्चाताप नाही.


इतर महत्वाच्या बातम्या