Kolhapur Rain Update: कोल्हापूर शहरात गेल्या 24 तासांपासून पावसाने उघडीप दिली असली, तरी जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसाने राधानगरी धरणाचे आज (26 जुलै) सकाळपासून चार स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत. धरणाच्या उघडलेल्या दरवाजातून भोगावती नदीपात्रामध्ये एकुण 7112 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये (kolhapur News) पाणी पोहोचण्यास साधारणपणे पंधरा तास लागतात. त्यामुळे यापूर्वीच पंचगंगा नदीने इशारा पातळीवरून वाहत असल्याने आजच रात्री पंचगंगा नदी धोका पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथम क्रमांकाने प्रभावित होणाऱ्या जिल्ह्यातील 27 शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली आहेत. 


घराच्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट पाहू नये. कारण त्यानंतर स्थलांतर करणे अवघड होऊन जाते. निवारागृहात महिला आणि पुरुषांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. घर सोडल्यानंतर पोलीस कर्मचारी घराचं संरक्षण करतील, असे त्यांनी सांगितले. काल 27 शाळा आणि आज कोल्हापूर शहरातील सर्व शाळांना सुट्टी दिली आहे. मुलं शाळेत गेल्यानंतर पालक स्थलांतरित होण्यास तयार होत नाहीत, त्यामुळे कोल्हापूर शहरातील शाळांना सुट्टी दिली असल्याचे रेखावार म्हणाले. 


जिल्हाधिकारी राहुल रेखावार काय म्हणाले?


पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी कुंभी, तुळशी, कासारी धरणातून पाणी पंचगंगा नदीमध्ये येत असते. राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये पाणी पोहोचण्यासाठी 15 तास लागतात. त्यामुळे आज दिवसभरात पाऊस जरी नाही झाला तरी साधारणपणे नदीची पाणीपातळी 44 फुटापर्यंत जाऊ शकते.


नागरिकांचे स्थलांतरित करण्यात येणार  


रेखावार यांनी सांगितले की, कोल्हापूर शहरामध्ये ज्या ठिकाणी पाणी येतं त्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. ते म्हणाले की, चिखली, आंबेवाडी आरे गावातील नागरिकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जनावरांच्या चाऱ्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांनी इचलकरंजी शिरोळ तालुक्यातील परिस्थितीवर भाष्य केले. इचलकरंजी शहर आणि शिरोळ तालुक्यात देखील नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 


केवळ बांधकामांना जबाबदार धरता येणार नाही


दरम्यान, पंचगंगा नदीमध्ये कोणत्याही प्रकारे धरणाचे पाणी येत नसतानाही इशारा पातळी वाहत असल्याने पुन्हा एकदा नदीपात्रामध्ये झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, या नदीच्या पाण्याला केवळ बांधकामांना जबाबदार धरता येणार नाही, पण या बांधकामांने काही परिणाम होत आहे. याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात आलं आहे. नवीन रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनमध्ये पालिकेने एकाही बांधकामाला परवानगी दिली नसल्याचा दावा त्यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या :