Kolhapur Rain Update: कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतल्याने दिलासा मिळाला आहे. काल (19 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फूट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. कोल्हापूर गारगोटी मार्गावर मडिलगेमध्ये पाणी आल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. राधानगरी सातपैकी पाच स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आता केवळ दोन स्वयंचलित दरवाजामधून विसर्ग सुरु आहे. 

तळ कोकण व गोव्याला जाण्यासाठी केवळ आंबोली मार्गे वाहतूक सुरू 

दरम्यान, तळकोकण व गोवा या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या तीन मार्गांपैकी सध्या केवळ आंबोली घाटमार्गे वाहतूक सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली आहे. सिंधुदुर्गात जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे भुईबावडा तसेच करूळ घाट आहे. तथापि, गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. दुसरा मार्ग म्हणजे राधानगरी तालुक्यातील फोंडा घाट. या मार्गावर देवगड निपाणी रोडवरील फेजिवडे येथील कब्रस्तान जवळ पुराचे पाणी आल्याने तो सुद्धा मार्ग ,पर्यायाने घाट बंद असल्याचे त्यांनी सांगितले. 

राधानगरी धरण 

  • पाणी पातळी :590.86M
  • पाणीसाठा - 8.28TMC 
  • 2 स्वयंचलित द्वारातून - 2856 विसर्ग 
  • मोहिते पावर हाऊसमधून 1500 
  • एकुण विसर्ग - 4356 क्युसेक 
  • राजाराम बंधारा पाणी पातळी : 39.05" (542.20m)
  • विसर्ग 56057 क्युसेक (नदी इशारा पातळी 39' फूट  व धोका पातळी 43' फूट) 

धरणांची विसर्ग माहिती

राधानगरी - 4356 क्युसेक दूधगंगा - 25000 क्युसेकवारणा - 39663 क्युसेककोयना - 95300 क्युसेकअलमट्टी - 200000 क्युसेकहिप्परगी - 82800 क्युसेक

कोयना धरणाचे वक्र दरवाजे 13 फुटापर्यंत उघडले

दरम्यान, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काल कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 12 फुटांवरून 13 फुटापर्यंत उघडून 93200 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 95,300 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

पूर परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा

दरम्यान, जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तथापि पूर परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.  आबिटकर म्हणाले की, मागील दोन दिवस जिल्ह्यात धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होवू शकते. तथापि नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. 

अलमट्टी व हिप्परगीच्या यंत्रणांशी समन्वय ठेवा

त्यांनी सांगितले की, राधानगरी व काळम्मावाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने सतर्क रहा. मुख्यालय सोडू नका. गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करा. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही जीवित हानी होणार नाही, याची दक्षता घ्या. अलमट्टी धरणातून जास्तीत जास्त विसर्ग होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कर्नाटक सरकारच्या संपर्कात असून जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्याच्या विसर्गाबाबत धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवावा, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

इतर महत्वाच्या बातम्या