Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) भुदरगड तालुक्यात रांगणा किल्ल्यावर जीव धोक्यात घालून हौशी पर्यटकाकडून झालेल्या प्रकारानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. भुदरगड तालुक्यातील जुलै ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत रांगणा किल्ला, शिवडाव बुद्रुक येथील नाईकवाडी धबधबा व दोनवडे येथील सवतकडा धबधबा तसेच भुदरगड तालुक्यालगत असणाऱ्या तोरस्करवाडी धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. स्थानिकांना सुद्धा बंदी करण्यात आल्याची माहिती भुदरगड तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसिलदार अश्विनी वरुटे-अडसूळ यांनी दिली आहे.
पावसाळा संपेपर्यंत पर्यटनासाठी जाऊ नये
भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रांगणा किल्ल्याच्या परिसरात पावसाळ्यामध्ये जाण्यासाठी अत्यंत बिकट मार्ग आहे. किल्ल्यावर जाताना वाटेत 5 ते 6 ओढे नाले आहेत. किल्ल्याच्या परिसरात नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलद्वारे किंवा कोणत्याही प्रकारे संपर्क करता येत नाही. 18 जुलै रोजी रांगणा किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 17 पर्यटक अडकले होते. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या घटनेची पुननावृत्ती होऊ नये किंवा एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळा संपेपर्यंत रांगणा किल्ल्याकडे तसेच शिवडाव बुद्रुक येथील नायकवाडी धबधबा व दोनवडे येथील सवतकडा धबधबा व नितवडे येथील तोरस्करवाडी धबधबा इत्यादी ठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळांकडे पर्यटनासाठी जाऊ नये, असे आवाहन अडसूळ यांनी केले आहे.
दरम्यान, पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या बर्की धबधब्याकडेही पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुसळधार पावसाने कासारी नदी पात्राबाहेर पडल्याने ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. राऊतवाडी धबधब्याने सुद्धा रौद्ररुप धारण केलं आहे. जीव धोक्यात न घालता राऊतवाडी धबधब्याकडे जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर दमदार हजेरी लावली. त्यामुळे मोसमात प्रथमच पंचगंगा नदी बुधवारी रात्रीच्या अकराच्या सुमारास पात्राबाहेर पडली. पंचगंगेची इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अत्यंत वेगाने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील जांबरे हा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख 15 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. राधानगरी धरणात 62.61 टक्के साठा झाला आहे. धरणातून भोगावती नदी पात्रात 1200 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. काळम्मावाडी धरणामध्ये 29.47 टक्के पाणीसाठा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख 122 जिल्हा आणि 24 राज्य मार्गांपैकी तीन जिल्हा आणिदोन राज्य मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 51 बंधारे पाण्याखाली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या