Radhanagari Dam: तीव्र उन्हाळ्यामुळे धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात आल्याने राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) पाणीसाठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबल्यास परिस्थिती चिंताजनक होऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून पाण्याच्या नियोजनासाठी प्रयत्न सुरु आहेत. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धरणातील पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राधानगरी धरणाची पाणी क्षमता सात टीएमसी आहे. धरणातून वरचेवर गरजेनुसार पाणी सोडण्यात आल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी झाला आहे. आजघडीला धरणातील पाणीसाठा  28 टक्के पाणी असला, तरी यामध्ये मृतसाठ्याचा समावेश आहे. त्यामुळे हे पाणी सर्वच वापरता येणार नाही. त्यामुळे पाणी पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे नियोजन सुरु आहे. 


राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान असून शेतीसह पिण्याचे पाणी सुद्धा याच धरणातून वापरले जाते. आजवर पाणीबाणी जाणवली नसली, तरी पावसाचे आगमन लांबल्यास परस्थिती कठिण होऊ शकते. गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये धरणात 3.53 टीएमसी पाणीसाठा होता. यंदा तो केवळ 2.88 टीएमसी आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. मान्सूनचे वेळेत आगमन झाल्यास अडचण येणार नाही.  


कोल्हापूर जिल्ह्याला वळीव पावसाचा दिलासा


कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तीन दिवसांमध्ये दोनवेळा झालेल्या दमदार वळीव पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नद्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्यासह उभी पीकेही संकटात आली होती. कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावरही गेल्या अनेक दिवसांपासून विपरित परिणाम झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भोगावती आणि पंचगंगा नदीने तळ गाठला आहे. 


दमदार वळीव पावसाने उभ्या पिकांना जीवदान


या पार्श्वभूमीवर जोरदार वळीव पावसाने हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला. जिल्हा प्रशासनाकडून पाणी नियोजनासाठी उपसा बंदी करण्यात आल्याने नदीकाठची पिके पूर्णत: धोक्यात आली होती. मात्र, दमदार वळीव पावसाने उभ्या पिकांना जीवदान मिळाले. भाजीपाल्याला सुद्धा चांगला लाभ झाला आहे. 24 मेपासून रोहिणी नक्षत्र सुरु होत आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतींना सुद्धा वेग आला आहे. तत्पूर्वी, दमदार वळीव पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या