Bidri Sakhar Karkhana: ऊसाला राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यात कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. बिनविरोधाची चर्चा सुरु झाली असली, तरी आजच्या घडीला अशी कोणती स्पष्टता आलेली नाही. कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांची सत्ता आहे. या निवडणुकीसाठी संचालक मंडळाची संख्या 21 वरुन 25 करण्यात आली आहे. कारखान्याचे राधानगरी, कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यातील 218 गावांमध्ये कार्यक्षेत्र आहे. 


बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी प्रादेशिक साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी प्रसिद्ध केली आहे. मतदानासाठी 'अ' वर्ग उत्पादक सभासद मतदार 55 हजार 65 इतके आहेत, तर 'ब' वर्ग संस्था गटासाठी 1022 व चार व्यक्ती असे मतदार पात्र ठरले आहेत. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत गेल्यावर्षी 10 ऑक्टोबर रोजी संपल्याने सध्या काळजीवाहू संचालक मंडळ काम करत आहे.


6 हजार 319 मृत सभासद वगळले


कारखान्याकडून सभासद यादी मागवण्यात आल्यानंतर त्याची छाननी करण्यात आली. त्यानंतर मृत सभासद यादी, कच्ची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर हरकती आणि आक्षेप नोंदवण्याची मुदत पार पडल्यानंतर अंतिम यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. कारखान्याचे एकूण 61 हजार 384 सभासद आहेत. तथापि, सभासदांची छाननी पार पडल्यानंतर 6 हजार 319 सभासद मृत झाल्याने यादीतून वगळण्यात आले. अंतिम मतदारयादी जाहीर झाल्याने आता पुढील दोन आठवड्यांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक होऊन प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे जून महिन्यात बिद्रीची रणधुमाळी होईल यामध्ये शंका नाही. 


बिनविरोधसाठी सूतोवाच, पण प्रत्यक्षात स्थिती काय?


कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार के.पी पाटील यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याला विरोधी आघाडीकडूनही आमची हरकत नसल्याचे म्हणत प्रतिसाद दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात अजून कोणतीही हालचाल झालेली नाही. दोन दिवसांपूर्वी कुरुकलीमध्ये (ता. कागल) बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी बिद्रीच्या बिनविरोध निवडणुकीवर भूमिका स्पष्ट केली होती. 


काय म्हणाले हसन मुश्रीफ?


हसन मुश्रीफ यावेळी बोलताना म्हणाले की, "बिद्री कारखान्याची अर्थव्यवस्था सशक्त ठेवून सातत्याने प्रत्येक वर्षी सर्वाधिक दर देण्याची किमया करणारे कारखान्याचे अध्यक्ष के.पी.पाटील यांच्याच नेतृत्वाखाली बिद्री कारखान्याचा कारभार असावा, अशीच सामान्य सभासद आणि जनतेची इच्छा आहे. सहकारी साखर उद्योग अडचणीत असताना बिद्री साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी. खासदार संजय मंडलिकही सकारात्मक आहेत, याबद्दल त्यांचे स्वागत आहे. पण, प्रत्यक्षात सभासद, चार तालुक्याचे कार्यक्षेत्र व इच्छुकांची संख्या पाहता हे कसं शक्य होईल की नाही, याबद्दल मनात थोडी शंका वाटते. मात्र, बिद्रीची निवडणूक बिनविरोध व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे, ती प्रत्यक्षात उतरावी इतकीच इच्छा आहे."


इतर महत्वाच्या बातम्या