Priya Patil Kolhapur : राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांत युवकांना सहभागी करण्यासाठी आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कोल्हापूरच्या प्रिया पाटीलची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रिया पाटील विवेकानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता 300 हून अधिक रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. तिच्या या सामाजिक कार्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे.
प्रिया पाटीलची निवड 2022/23 या कालावधीसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राष्ट्रीय सेवा योजना राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे यांनी ही निवड केली. राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने आयोजित करणे, विद्यार्थी व युवकांशी संवाद साधणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमार्फत शासनाच्या विविध योजना, उपक्रम, साध्य करण्याचे काम सदिच्छादूत म्हणून प्रिया पाटील करेल.
प्रियाने निवडीनंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची भेट घेतली. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये, विवेकानंदचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार, कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील, डॉ. एच.पी. पाटील, डॉ. आर.जी. कोरबू उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या