कोल्हापूर : सरकारकडून दिव्यांगांसाठी जो निधी दिला जातो तो त्यांच्या विकासासाठी खर्च करा, जिल्ह्यातील दिव्यांगाचा एकही प्रश्न शिल्लक ठेऊ नका अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शुक्रवारी दिव्यांग संघटना आणि प्रशासकीय अधिकारी यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत ही बैठक बोलावली. या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि दिव्यांगांच्या संबंधित सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री वेगवान प्रशासकीय कार्यक्रम अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांगांचे प्रश्न तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. इतकंच नाही तर या कामांच्या पाठपुराव्याचा अहवाल देण्याच्या सूचना देखील पालकमंत्री यांनी केल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांगांच्या घरकुलाचा प्रश्न खूप दिवसांपासून रखडलेला आहे, तो प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर सरकारकडून दिव्यांग नागरिकांसाठी जो निधी दिला जातो त्या निधीचा 100 टक्के खर्च दिव्यांग व्यक्तींसाठीच करण्यात यावा अशा सूचना देखील पालकमंत्री यांनी दिल्या आहेत.
दिव्यांग व्यक्तींसाठी अपंग कार्ड सगळ्यात महत्त्वाचे असते. मात्र ते कार्ड मिळवताना दिव्यांगांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. दिव्यांगाना हे कार्ड अतिशय सुलभ पद्धतीने मिळावे यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात पाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या सीपीआर या ठिकाणी दिव्यांग कार्ड घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे गर्दी कमी होईल.
पोलीस प्रशासनाला प्रकाश आबिटकर यांच्या सूचना
पोलीस ठाण्यामध्ये एखादा दिव्यांग व्यक्ती तक्रार नोंदवण्यासाठी आला असेल तर त्यांची तक्रार नोंदवून घेणे, त्याचबरोबर त्यांना योग्य सन्मान देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. अनेक प्रशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी दिव्यांगांसाठींचा रॅम्प बनवलेला नाही. तो तातडीने बनवला जावा अशी देखील सूचना पालकमंत्री यांनी दिली. आज राज्यात आणि देशात दिव्यांगांच्या विविध खेळांमध्ये जिल्ह्यातील खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यांच्यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत.
दिव्यांगांसाठी आता एसटीमध्ये अनाउन्समेंट
महाराष्ट्र राज्याच्या परिवहन बसमधून प्रवास करत असताना दिव्यांगांसाठी आरक्षित जागा असतात. मात्र अलीकडे या जागांवर सर्वसामान्य नागरिक बसतात. ज्यावेळी बसमध्ये एखादा दिव्यांग व्यक्ती आला तर तातडीने ती जागा खाली करून देणे गरजेचे आहे. यासाठी त्या बसमधील वाहकाला वेळोवेळी बसमध्ये अनाउन्समेंट करावी लागेल. इतकंच नाही तर बस स्थानकावर देखील या संदर्भातली अनाउन्समेंट करा जेणेकरून प्रवास करत असताना दिव्यांग व्यक्ती आढळून आल्यास त्यांना तातडीने बसण्यासाठी जागा मिळेल.