Kolhapur Police : कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या 15 गुन्ह्यातील चोरीस गेलेले एकूण 54,45,000 किंमतीचे 990 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कोल्हापूर पोलीसांकडून (Kolhapur Police) 15 मुळ मालकांना परत करण्यात आले. कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या हस्ते हे दागिने मुळ मालकांना परत करण्यात आले. यामध्ये जबरी चोरी, घरफोडी, चोरी, सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक गुन्ह्यातील सोन्याचे दागिने वृध्द महिला, जेष्ठ नागरिक यांना परत करण्यात आले. कष्टाचे दागिने परत मिळाल्यानंतर काहींना यावेळी अश्रु अनावर झाले. कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी 23 ते 25 मार्च या कालावधीत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचा कामकाजाचा आढावा घेतला. चांगल्या कामगिरीबद्दल पोलीस व नागरिक यांचा सत्कार करुन संवाद साधला.


नागरीकांनी आपले दैनंदिन काम करीत असताना त्यांनी केलेल्या प्रशंसनीय कामासाठी देवीचंद राठोड  (रा. कोल्हापूर, १० किलो वजनाचा हरविलेला चांदीचा पास्टा मालकांना परत केला. सुप्रिया मुकुंद देशपांडे (रा. लक्ष्मीपुरी कोल्हापूर, बेवारस मयतावर अंत्यसंस्कार करणेस पोलिसांना सतत मदत) अभिनंदन रामचंद्र मदभावे (रा. गणेशवाडी, ता. शिरोळ), स्वतःचा जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या चोरट्यांना पकडून दिले. तसेच कोल्हापूर पोलीस दलातील एकूण 12 पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तसेच डायल 112 या आपत्कालीन सुविधांव्दारे नागरीकांचे प्राण वाचवून पोलीस दलाचा लौकीक वाढवल्याबद्दल प्रशंसापत्र देवून गौरविण्यात आले.


दरम्यान, सुनील फुलारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग, पन्हाळा पोलीस ठाणे व राजारामपुरी पोलीस ठाणे येथे भेटी देवून कार्यालयीन कामकाजाचा आणि अभिलेखाचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी तसेच अधिकाऱ्यांना प्रलंबित असणारे अर्ज, गुन्हे निर्गती करण्याबाबत, कम्युनिटी पोलीसिंग मार्फत नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्राधान्याने निरसन करणेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील, मंगेश चव्हाण, संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, महादेव वाघमोडे यांचेसह कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या