मुंबई : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ करणारी वक्तव्यं आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
एकीकडे छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे, दर त्यावरून वादाची मालिकाही संपायला तयार नाही. आता यात नाव जोडलं गेलंय तर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचं. छावा चित्रपटावर बोलताना ब्राह्मणद्वेषी विचार मांडल्याचा आरोप करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं ही धमकी दिल्याची माहिती स्वत: इंद्रजीत सावंत यांनी दिली. इंद्रजीत सावंत यांनी या प्रकरणाची ऑडिओ क्लीपसुद्धा सार्वजनिक केली.
फोनवरच्या व्यक्तीनं शिवाजी महाराजांचाही एकेरी उल्लेख केला असा जबाब कोल्हापूर पोलिसांनी नोंदवला आहे. तर नागपूर पोलिसांच्या सायबर सेलनं सावंत यांच्याकडे ऑडिओ क्लीपची मागणी केली आहे.
इंद्रजीत सावंत यांची तक्रार
इंद्रजीत सावंत म्हणाले की, "मी मला आलेला फोन त्याची डिटेल्स दिली आहे. हा फोन कोठून आला होता, कोणी केला होता याची तपासणी पोलिसांनी करावी. मला मिळालेल्या धमकीपेक्षा छत्रपती संभाजीराजे आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दबाबत मी तक्रार दिली आहे. माझ्या धमकीबाबत पोलिसांनी सुमोटो कारवाई करावी. कोरटकर यांनी इंस्टाग्राम वरूनही मला धमकी दिली आहे. याच्या पाठीमागे कोण आहे हे तपासण्याची गरज आहे. पोलिसांनी छत्रपतींबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी. पुन्हा कोणी धाडस करणार नाही अशी कारवाई करावी."
तो आवाज आपला नसल्याचा कोरटकरांचा दावा
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना आलेला धमकीचा फोन माझा नसल्याचं स्पष्टीकरण प्रशांत कोरटकरांनी दिलं आहे. इंद्रजीत सावंतांशी काही देणंघेणं नसून, त्यांनी शहानिशा न करता केलेल्या आरोपामुळे मनस्ताप झाल्याचं कोरटकर म्हणाले. ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नाही असं स्पष्टीकरण प्रशांत कोरटकर यांनी दिलं.
प्रशांत कोरटकर म्हणाले की, "फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जी कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांनी पोस्ट केली आहे, त्या कॉल रेकॉर्डिंग मधील आवाजही माझा नाही. इंद्रजीत सावंत यांनी फेसबुक पोस्ट करून माझं नाव वापरण्यापूर्वी किमान माझ्याशी संपर्क साधायला हवा होता. किंबहुना त्यांना आलेला कॉल मीच केला आहे की नाही याची शहानिशा करायला हवी होती. त्यांनी असं काहीही न करता फेसबुक पोस्ट करून माझी बदनामी तर केलीच आहे, सोबतच मला सकाळपासून अनेक धमकीचे कॉल येत आहेत. त्यामुळे मी इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात पोलिसांकडे आणि सायबर सेलमध्ये तक्रार करणार आहे."
ही बातमी वाचा: