Continues below advertisement

कोल्हापूर : खासगी क्लास संपवून घरी जाणारे दोन भाऊ वाहत्या गटारात पडले आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली. कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरात ही घटना घडली. गटारातून वाहून जाणाऱ्या आठ वर्षांच्या लहान भावाला वाचवण्यासाठी अकरा वर्षांचा मोठा भाऊ गेला आणि त्याचाच मृत्यू झाला. केदार कांबळे(Kedar Kamble) असं या अकरा वर्षांच्या मृत मुलाचे नाव आहे.

Kolhapur Phulewadi Accident : खेळता खेळता गटारात पडले

जेम्स कांबळे आणि केदार कांबळे हे दोघे भाऊ खासगी क्लासवरून खेळत-बागडत घरी जात होते. त्यावेळी लहान भाऊ जेम्स हा गटारीत पडला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गटार तुडूंब वाहत होती. जेम्सला वाचवण्यासाठी केदारही गटारात उतरला.

Continues below advertisement

गटारातील वाहत्या पाण्याला गती असल्याने दोघेही 30 ते 35 फुट वाहत गेले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला.

Kolhapur News : दोघांना बाहेर काढले, एकाचा मृत्यू

गटारीच्या पाण्याची खोली जास्त होती आणि त्याचा प्रवाहही जास्त होता. त्यामुळे नागरिकांना या दोघा मुलांना वाचवण्यात अडचणी येत होत्या. त्यावेळी काही तरुणांनी या गटातील सिमेंटचे पत्रे टाकले आणि पाण्याचा प्रवाह कमी केला. त्याचवेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोन्ही लहान मुलांना बाहेर काढलं. त्यावेळी केदार बेशुद्ध अवस्थेत होता तर जेम्सही गंभीर होता.

या दोन्ही भावांना तात्काळ सीपीआरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान केदार कांबळेचा मृत्यू झाला. तर लहान भाऊ असलेल्या जेम्सचा जीव मात्र वाचला. या घटनेने कांबळे कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळलं.