कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या विशाळगडावरील हिंसक घटनांच्या प्रकरणावर आज (19 जुलै) हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनानं हाती घेतलेली मोहीम तसेच विशाळगड अतिक्रमणांपासून वाचवण्यासाठी उजव्या विचारसणीच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनेचं प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. 


बांधकाम पाडण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची याचिकेत मागणी


कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला विशाळगडावरील बांधकाम पाडण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. तसेच बांधकामांना याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. या बांधकामांविरोधातील कारवाईदरम्यान घडलेल्या घटनांविषयी याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम सध्या स्थानिक प्रशासनानं हाती घेतली आहे. काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून 'चलो विशाळगड' किंवा 'विशाळगड बचाव' मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला आणि आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. 


हिंसाचारग्रस्त भागाची अजित पवारांकडून पाहणी


दरम्यान, विशाळगडावरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. विशाळगडाजवळ गजापुरात झालेल्या या हिंसाचाराच्या घटनेनंतर चार दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील आपले सर्व कार्यक्रम रद्द करून विशाळगडाजवळील गजापुरात काल (18 जुलै) पोहोचले. अजित पवार यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत पीडितांशी संवाद साधला. पीडितांनी झालेल्या नुकसानाची माहिती देताना कशा पद्धतीने हल्ला करण्यात आला. याची माहिती सांगितली. सरकारने योग्य मदत करावी आणि ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


शिवाय, या परिसरातील संचारबंदी हटवण्याची मागणीही केली. यावेळी अजित पवार म्हणाले, मी आताच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली आहे. विशाळगडावरील ज्या व्यवसायिक आस्थापना आहेत, जे अतिक्रमण झालं आहे. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. तसेच, कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही, असे अजित पवार यांनी यावेळी पीडितांना सांगितले. गेल्या काही वर्षांपासून किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली होती. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शिवप्रेमींना विशाळगड येथे येण्याचे आवाहन केले होते. त्यानंत विशाळगडाजवळील गजापुरात जमावाने केलेल्या दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये अनेक घरे, वाहनांचे नुकसान झाले. 


इतर महत्वाच्या बातम्या