कोल्हापूर : आर्मी भरतीचं (Indian Army) स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने अकादमीत पैसे भरण्यासाठी कमी पडल्याने चक्क चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) भुदरगड (Bhudargad) तालुक्यात घडला. भुदरगड पोलिसांनी आरोपी अर्जुन शामराव पाटील (रा. बारवे, ता. भुदरगड जि. कोल्हापूर) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बजरंग गणपती पाटील (रा. बारवे ता. भुदरगड)  यांनी फिर्याद दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी गारगोटीमध्येहजर केले असता न्यायालयाने आरोपीत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


अकादमीची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने चोरी 


पोलिसांनी (Kolhapur Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बजरंग पाटील यांच्या घरात आरोपी अर्जुन पाटीलने मागील दरवाज्यातून प्रवेश करून 14 तोळे सोने व 4100 रोख रक्कम असा एकूण 7,87,350 रुपयांचा मुद्देमाल पळवला होता. यानंतर पोलिसांनी कसून तपास करत आरोपीचा माग काढला. गोपनीय माहितीच्या आधारे ही चोरी आरोपी अर्जुन शामराव पाटीलने केल्याचे निष्पन्न  झाले. पोलिस व आर्मी भरतीसाठी अकादमीची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने प्रथमच चोरी केली. आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


सदर कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज निकेश खाटमोडे-पाटील, गडहिंग्लज पोलिस उपाधीक्षक राजू नवले यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल महादेव मगदूम, पोलिस नाईक संदेश कांबळे, सतीश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल धनाजी सुतार, रोहित टिपुगडे, यांनी गुन्हा उघडकीस आणला. 


कांतीलाल चोरडियांवर कोल्हापुरात गुन्हा दाखल


दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय कांतीलाल चोरडिया यांच्यावर कोल्हापुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांतीलाल चोरडियांवर 60 कोटी रुपयांची 20 हजार स्क्वेअरफूट जमीन बनावट वटमुखत्यारपत्र करून हडपल्याची तक्रार जिंतेंद्र राचोजीराव जाधव (वय 64, रा. मायाक्का चिंचली, ता. रायबाग, जि. बेळगाव) यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कांतीलाल चोरडिया यांचे सख्खे बंधू ईश्वरलाल चोरडिया यांच्याच बंगल्यावर अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली होती. तक्रारदार जाधव यांनी कांतीलाल चोरडिया यांनी बाबासाहेब गणेश देसाई (रा. शाहूपुरी, कोल्हापूर), बाबासाहेब पांडूरंग जाधव (रा. शाहुपुरी, कोल्हापूर) नितीन श्रीकांत चौगुले (रा. शाहुपुरी, कोल्हापूर) आणि एस. बी. पाटील (रा. शाहुपुरी, कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या