कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 15 ते 29 जुलै या कालावधीत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. किल्ले विशाळगडमधील अनाधिकृत अतिक्रमणविरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. तसेच विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा, इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात येते. मोहरम सण व आषाढीवारी, नंदवाळ यात्रा, सण इत्यादी साजरे होणार आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात दिनांक 15 जुलैपासून सकाळी 6 ते 29 जुलै रोजी रात्री बारापर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी बंदी आदेश जारी केला आहे.
कोणाला बंदी आदेश लागू होणार नाही?
हा आदेश ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणे संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.
विशाळगडला कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात
दरम्यान, विशाळगडगडावर अनाधिकृत अतिक्रमणविरोधात संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्या (14 जुलै) कोणत्याही परिस्थितीत गडावर जाण्याची भूमिका राजेंनी घेतली आङे. या पार्श्वभूमीवर विशाळगडला कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गडावर जाणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आलेली वाहने परत गेली. स्थानिकांची खात्री करूनच गडावर सोडले जात आहे.
महायुतीत गेल्यामुळे तुम्ही दबाव टाकून काहीही करणार का?
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, सरकारने विशाळगडावर ग्रामपंचायत आणि ब्रीज कसे काय बांधले? पुरातत्व खात्याचे नियम असताना इथं का नियम लावले नाहीत? स्थानिक आमदारांनी हे दबाव टाकून केलं. या सगळ्याची सुरुवात स्थानिक आमदार विनय कोरे यांनी सुरूवात केली. महायुतीत गेल्यामुळे तुम्ही दबाव टाकून काहीही करणार का? असा सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी विनय कोरेंना केला.
इतर महत्वाच्या बातम्या