कोल्हापूर: काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा निरीक्षक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील आढावा घेणार आहेत. आज (12 ऑगस्ट) त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आढावा घेतला. हातकणंगले मतदारसंघातून भक्कम तयारी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. चव्हाण यांनी राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी कोणत्या पातळीवर राजू  शेट्टी यांच्याशी चर्चा झाली, याचा तपशील जाहीर करण्यास नकार दिला.


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राजू शेट्टी कधीही भाजपसोबत जाणार नाहीत. त्यांनी नेहमीच जातीवादी पक्षांना विरोध केला आहे. राजू शेट्टी यांच्यासोबत महाविकास आघाडीची चर्चा चालू आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीची ताकद वाढत असल्याचे ते म्हणाले.  


बीआरएस पार्टी भाजपची बी टीम, सर्व रसद भाजपकडून


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, बीआरएस भाजपची बी टीम आहे. त्यांना सर्व रसद भाजपकडून पुरवली जात आहे. चव्हाण यांनी काँग्रेसच्या तयारीवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, काँग्रेसकडून 24 टीम महाराष्ट्र राज्यात पाठवण्यात आल्या आहेत. 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. माझ्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. आता केवळ आम्ही मित्रपक्ष, विरोधात कोण आहे, आमची ताकद किती आहे याचा आढावा घेत असल्याचे चव्हाण म्हणाले. 


चव्हाण म्हणाले की, विरोधकांच्या इंडिया आघाडीची ताकद वाढत आहे. कर्नाटक पॅटर्न काँग्रेसने महाराष्ट्रात राबवला आहे. राज्यात आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणे भाजपला विरोध करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटल्यानंतर मतदारसंघात काय भावना आहेत हे मी पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष फुटला असला तरी जनता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूनं आहे, नागरिक निवडणुकीची वाट पाहत आहेत, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 


दरम्यान, उद्या रविवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील करवीर, चंदगड, कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार, तालुकाध्यक्ष आणि प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत. रविवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या