कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छतेसाठी सर्व नागरिकांनी एक तास श्रमदान करण्याचे आवाहन केले होते. इचलकरंजीमध्ये याच महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमात आमदार प्रकाश आवाडे आणि माजी नगरसेवक सागर चाळके यांच्या भर व्यासपीठावर खडाजंगी झाली. दोघांची बाचाबाची सुरु असतानाच व्यासपीठावर बाजूलाच बसलेल्या खासदार धैर्यशील माने यांना तोंडाकडे पाहण्याची वेळ आली.
वाद नेमका कशावरून झाला?
आमदार प्रकाश आवाडे आणि सागर चाळके यांच्यामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जागेवरून हा वाद झाला. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाड, महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, माजी नगरसेवक सागर चाळके उपस्थित होते. आमदार आवाडे यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर इचलकरंजीमधील मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास परवानगी मिळाली असून लवकरात लवकर काम पूर्ण होईल, असे सांगितले. यालाच माजी नगरसेवक सागर चाळके यांनी आक्षेप घेतला. छत्रपती संभाजी महाराज चौक असताना या चौकातच स्मारक व्हावे, अशी भूमिका चाळके यांनी घेतली. त्यावरून आमदार आणि माजी नगरसेवक यांच्यामध्ये खडाजंगी झाली.
कोल्हापुरात पार पडला स्वच्छता पंधरवडा
दुसरीकडे, कोल्हापूर मनपाकडून अंबाबाई मंदीर परिसर, रेल्वे स्टेशन, टेंबलाई मंदिर परिसर, तोरस्कर चौक मेनरोड, पाडळकर मार्केट परिसर, विकास हायस्कूल रोड, आयटीआय रोड, क्रीडा संकूल रोड, सायबर कॉलेज रोड, यादवनगर, सदरबाजार मेनरोड, शिये फाटा मेन रोड, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर मार्केट रोड, शिरोली जकात नाका ते तावडे हॉटेल मेनरोड, पंचगंगा नदीघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी महालक्ष्मी परिसरात या मोहितमेचा शुभारंभ केला. यानंतर त्यांनी या परिसरात स्वच्छता करुन, रेल्वे स्टेशन, टेंबलाईवाडी येथे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेत महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचा-यांसह, आयकर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध शैक्षणिक संस्था, युवा क्लब, NCC, NSS, नागरिक इत्यादिंना सहभाग नोंदवून शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता केली.
इतर महत्वाच्या बातम्या