कोल्हापूर : आशिया खंडातील सर्वात मोठा संघ म्हणून कोल्हापुरातील (Kolhapur News) शेतकरी सहकारी संघाची ओळख आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ( या संघाची इमारत कुलूप तोडून ताब्यात घेण्याचे आदेश दिले. या प्रकारानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. आज (ता. 30) शेतकरी संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावून कोल्हापूरच्या सर्वच नेत्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलेल्या कृतीचा निषेध केला.
कोल्हापूरचे पालकमंत्री शिंदे गटाचे, खासदार आमदार शिंदे गटाचे असताना कुलूप तोडण्याचे धाडस जिल्हाधिकाऱ्यांचे झाले कसे? असा सवाल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उपस्थित केला. शेतकरी संघाच्या सभासदांच्या भावना पालकमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. शिवाय योग्य तोडगा काढू अशा पद्धतीची भूमिका खासदार संजय मंडलिक यांनी मांडली.
हजारो सभासदांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
दुसरीकडे शेतकरी सहकारी संघाच्या मालकीची इमारत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी (Kolhapur News) तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहित केल्यानंतर सभासद आक्रमक झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो सभासदांनी विराट मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा आणि पालकमंत्री दीपक केसरकरांचा धिक्कार केला होता. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सभासदांनी शेतकरी संघ सभासदांचा, नाही कोणाच्या बापाचा, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांचाही सहभाग होता.
वादाची ठिणगी कशी पडली?
आगामी नवारात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश काढत शेतकरी संघाच्या मालकीच्या इमारतीमधील तीन मजले ताब्यात घेतले आहेत. यानंतर संतप्त प्रतिक्रिया शेतकरी सभासदांमध्ये उमटल्या. शेतकरी सहकारी संघाची जागा ताब्यात घेतली नसून जिल्हाधिकाऱ्यांनी दरोडा टाकला आहे. एवढ्या तातडीने जागा का ताब्यात घेतली? असा सवालही सभासदांकडून उपस्थित करण्यात आला.
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावरही प्रचंड रोष सभासदांनी व्यक्त केला आहे. केसरकरांना जागा बळकावण्याची असल्याचा आरोपही होत आहे. नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी होते. या गर्दीसाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरून चुकीच्या पद्धतीने आणि बेकायेदशीररीत्या शेतकरी संघाची जागा ताब्यात घेतल्याचा आरोप शेतकरी संघाच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या